डेन्मार्कमध्ये कुराण जाळल्याने "ब्लास्फेमी'चा गुन्हा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

गेल्या दशकभराच्या काळापासून इस्लामच्या सार्वजनिक आयुष्यामधील भूमिकेसंदर्भात डेन्मार्कमध्ये विविध विचारप्रवाह दिसून आले आहेत. 2005 मध्ये येथील एका वृत्तपत्राने प्रेषित मोहम्मद यांची 12 व्यंगचित्रे प्रकाशित केल्यानंतर देशात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती

कोनहेगन - मुस्लिम धर्मीयांचा पवित्र धर्मग्रंथ असलेले "कुराण' जाळून त्याचे चित्रीकरण फेसबुकवर प्रसिद्ध करणाऱ्या एका 42 वर्षीय नागरिकाविरोधात डेन्मार्कमध्ये पाखंडीपणाचा (ब्लास्फेमी) आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपामुळे डेन्मार्कमध्ये आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले आहे. डेन्मार्कमध्ये उदारमतवादाची प्रदीर्घ परंपरा असून या देशात 1946 पासून ब्लास्फेमींतर्गत कोणालाही दोषी ठरविण्यात आलेले नाही. मात्र व्हायबोर्ग येथील प्रादेशिक दंडाधिकाऱ्यांनी कुराण जाळण्याची ही कृती पाखंडीपणा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुक्त पुरस्काराने करणाऱ्या डेन्मार्कमध्ये राष्ट्रध्वज जाळणे हीदेखील गुन्हा समजला जात नाही. परंतु गेल्या दशकभराच्या काळापासून इस्लामच्या सार्वजनिक आयुष्यामधील भूमिकेसंदर्भात डेन्मार्कमध्ये विविध विचारप्रवाह दिसून आले आहेत. 2005 मध्ये येथील एका वृत्तपत्राने प्रेषित मोहम्मद यांची 12 व्यंगचित्रे प्रकाशित केल्यानंतर देशात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. याशिवाय, डेन्मार्कवर आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापारी बहिष्कार घालण्याबरोबरच पश्‍चिम आशियामधील डेन्मार्कच्या दूतावासांवर हल्लेही करण्यात आले होते.

कुराण जाळण्यासंदर्भातील हा व्हिडिओ 415 वेळा शेअर करण्यात आला असून ही कृती करणाऱ्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. डेन्मार्कमधील नियमाप्रमाणे आरोपी निश्‍चितपणे दोषी आढळल्याखेरीज त्याचे नाव जाहीर करण्यात येत नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

Web Title: Danish Man Who Burned Quran Is Prosecuted for Blasphemy