esakal | दाऊदचा पत्ता तुम्हाला माहिती आहे का? पाकिस्ताननं जाहीर केलाय
sakal

बोलून बातमी शोधा

daud ibrahim1.jpg

गेल्या अनेक वर्षांपासून दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये राहत आहे.

दाऊदचा पत्ता तुम्हाला माहिती आहे का? पाकिस्ताननं जाहीर केलाय

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

इस्लामाबाद- भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम कराचीमध्ये राहत असल्याचं शुक्रवारी पाकिस्तानने कबुल केलं. गेल्या अनेक वर्षांपासून दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये राहत आहे. भारताने वेळोवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा पाठपुरावा केला, पण पाकिस्तानने नेहमीच दाऊद देशात असल्याचं नाकारलं. मात्र, आता पाकिस्तानने दाऊद कराचीमध्ये असल्याचं कबुल केलं आहे. 

राफेल करारासंबंधी CAG ला माहिती देण्यास संरक्षण मंत्रालयाचा नकार!

पाकिस्तानने 88 दहशतवादी संघटना आणि त्यांच्या प्रमुखांवर बंदी आणल्याचे शुक्रवारी जाहीर केलं आहे. यात 26/11 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद, जैश ए मोहम्मद प्रमुख मसूद अझर आणि मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम यांचा समावेश आहे. पाकिस्तानने यादीमध्ये दाऊदचा समावेश करुन तो देशात असल्याचं मान्य केलं आहे. दाऊद हा 1993 सालच्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांसाठी दोषी आहे. शिवाय 26/11 मुंबई हल्ल्यात दाऊदने दहशतवाद्यांना महत्वाची माहिती पुरवली होती.

आंतरराष्ट्रीय पातळीवर फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स  Financial Action Task Force (FATF) या संघटनेने जून 2018 मध्ये पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकत 2019 संपेपर्यंत दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही तारीख पुढे वाढवण्यात आली होती. पाकिस्तानने 88 संघटनांवर बंदी आणत आर्थिक निर्बंध लादले आहेत. यानुसार दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. तसेच त्यांची बँक खाती गोठवण्यात येणार आहेत. 

पंजाबमध्ये पाच घुसखोर ठार; पाकिस्तानच्या सीमेवरून भारतात येण्याचा प्रयत्न

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनुसार, दाऊद इब्राहिम 'व्हाईट हॉऊस, सौदी मशिद जवळ, क्लिफ्टोन, कराची' येथे वास्तव्यास आहे. याशिवाय 'हाऊस नं. 37- 30 स्ट्रीट- डिफेन्स, हॉऊसिंग सोसायटी, कराची' आणि 'नुराबाद येथील टेकडीवरील पॅलाटीयल बिल्डिंग' येथे दाऊदची मालमत्ता आहे. दाऊदच्या या सर्व मालमत्तेवर पाकिस्तान टाच आणणार आहे.

दाऊद इब्राहीम पाकिस्तानमध्ये मुक्तपणे राहत असल्याचे पुरावे भारताने पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय संस्थेला (यूनो) वेळोवेळी दिले होते. मात्र, गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान दाऊद कराचीत असल्याचं मान्य करत नव्हता. पाकिस्तानने ओसामा बिन लादेनही देशात नसल्याचं म्हटलं होतं. पण, अमेरिकेने ओबामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून मारलं होतं. 

(edited by- kartik pujari)