China Marriage | चीनमध्ये घटतेय विवाहाचे प्रमाण; काय आहेत कारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चीनमध्ये घटतेय विवाहाचे प्रमाण; काय आहेत कारणे
चीनमध्ये घटतेय विवाहाचे प्रमाण; काय आहेत कारणे

चीनमध्ये घटतेय विवाहाचे प्रमाण; काय आहेत कारणे

बीजिंग - जन्मदर कमी झाल्याने लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी चीनने एक अपत्य धोरणाचा त्याग करत तीन अपत्यांना जन्म घालण्यास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली असताना एक नवीच अडचण त्यांना आढळून आली आहे. चीनमध्ये विवाह करणाऱ्यांचेच प्रमाण कमी झाले असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून आले आहे.

चीनमध्ये सलग सातव्या वर्षी विवाह करणाऱ्यांची संख्या घटली आहे. गेल्या वर्षी नोंदणी झालेल्या विवाहांची संख्या आधीच्या १७ वर्षांतील नीचांकी आहे. चीनमध्ये यंदाच्या वर्षी पहिल्या नऊ महिन्यांमध्ये ५८ लाख ७० हजार विवाहांची नोंद झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदल्या गेलेल्या विवाहांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. चीनमध्ये जन्मदर सध्या ०.८५२ इतका आहे. १९७८ नंतर तो प्रथमच एक टक्क्याच्या खाली आला आहे. आता विवाह करण्याकडेच लोकांचा अनुत्साह असल्याने लोकसंख्येच्या समतोलावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: अभंग,ओवी, शाहिरी डफ दुबईत कडाडला ; कलाविष्काराने प्रेक्षक भारावले

युवकांचे प्रमाण कमी होत असल्याने चीनने २०१६ मध्ये एक अपत्य धोरण बासनात गुंडाळत दोन अपत्य धोरण सुरु केले. त्यातही सुधारणा करत यार्षीपासून तीन अपत्यांसाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, वाढती महागाई आणि इतर कारणांमुळे या धोरणाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. देशाच्या एकूण लोकसंख्येत वयाच्या साठीच्या वर असलेल्या नागरिकांची संख्या २६ कोटी ४० लाखांच्या वर गेली आहे. हे प्रमाण १८.७ टक्के असून २०३६ पर्यंत हे प्रमाण २९.१ टक्के असेल, असा अंदाज एका अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.

विवाह टाळण्याची कारणे

  • कामाचा प्रचंड ताण

  • मुलींच्या शैक्षणिक दर्जात आणि आर्थिक स्वावलंबनात मोठी वाढ

  • व्यस्त लिंग गुणोत्तर

  • महागाई, घरांच्या किमतीत वाढ

loading image
go to top