
Video : लिफ्टमध्ये कुत्र्याला बसला गळफास; डिलिव्हरी बॉयने वाचवले प्राण
Video : लिफ्टमध्ये अडकून कुत्र्याला बसला गळफास; डिलीव्हरी बॉयने वाचवले प्राण
‘देव तारी त्याला कोण मारी’ असं म्हणतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ पाहिला की याची प्रचिती येते. लिफ्टमध्ये अडकून फास लागलेल्या एका पाळीव कुत्र्याची डिलीव्हरी बॉयने सुटका केली आणि कुत्र्याचा जीव वाचवला. कुत्र्याच्या सुटकेचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल. चीनमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. (Viral video Delivery Boy saved lives Dogs get stuck in elevator)
कुत्रा हा इमानदार प्राणी. कधी राखण करण्यासाठी तर कधी फक्त हौस म्हणून अनेक लोक कुत्रा पाळतात. कुत्र्याला तुम्ही शिळी भाकरी खायला घाला नाहीतर महागडी बिस्कीटं, तो आपल्या मालकाची साथ कधीच सोडत नाही. म्हणूनच अनेक लोक कुत्र्याकडे प्राणी म्हणून नाही तर कुटूंबातील एक सदस्य म्हणून पाहतात. अशाच एका गोंडस पाळीव कुत्र्याचा जीव अगदी थोडक्यात बचावला.
१.२८ मिनिटांच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये सुरुवातीला एका इमारतीच्या एका मजल्यावर एक लिफ्ट दिसते. एक पांढऱ्या रंगाचा गोंडस कुत्रा तिथं येतो. त्याच्या गळ्यात पट्टा असतो आणि पट्ट्याला दोरी लावलेली असते. कुत्रा येतो ते थेट लिफ्टमध्येच शिरतो. पण तेवढ्यात लिफ्टचा दरवाजा बंद होतो. पण यादरम्यान कुत्र्याच्या गळातील दोरी अर्धी बाहेरच राहते आणि दरवाज्याच्या फटीत अडकते. अचानक लिफ्ट खाली जाऊ लागते. जसजशी लिफ्ट खाली जाते तसतसा दोरी वरच्या मजल्यावरी लिफ्टच्या बाहेरच्या दरवाज्यामध्ये अडकल्यामुळे कुत्राही वर उचलला जातो आणि हवेत लटकू लागतो. गळ्यातील पट्ट्यामुळे त्याला फास लागतो. त्याची तडफड चालू असते. तो जीवाच्या आकांताने ओरडतो पण, सुदैवाने लिफ्ट लगेच खालच्या मजल्यावर जाऊन थांबते. लिफ्टचा दरवाजा उघडतो तसा लिफ्टच्या बाहेर एक डिलीव्हरी बॉय दिसतो. सुरुवातीला तोही बिचकतो. आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून तो त्या कुत्र्याजवळ जातो आणि त्याला उचलून घेतो. ताबडतोब कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा काढून त्याला सोडवतो आणि कुत्र्याचा जीव वाचतो. या घटनेनं थोडावेळ का होईना पण काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही.
डिलीव्हरी बॉयने दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल त्याचं कौतुक करावं थोडंच. तो देवदूतासारखा धावून आला आणि कुत्र्याचे प्राण वाचवले. लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली..
कुत्र्याला नंतर त्याच्या मालकाच्या ताब्यात देण्यात आलं. या कुत्र्याचं दैव बलवत्तर म्हणून तो डिलीव्हरी बॉय तिथं पोचला आणि त्याचा जीव वाचला. एका अर्थाने हेही महत्ताचं आहे की लिफ्ट फक्त एकच मजला खाली गेली. जर लिफ्ट अजून खाली गेली असती तर कुत्र्याचा जीव वाचणं कठीण झालं असतं. असो...देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात, तेच खरं.....
मुक्या जनावरांचे असे अपघात अनेकदा होताना दिसतात. अशा प्राण्यांना वाचवून आपण माणूस असल्याचं दाखवण्याची संधी कमी वेळा मिळते. या डिलीव्हरी बॉयने ती साधली.या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला. कुणी या व्हिडीओतील कुत्र्याला नशीबवान म्हटलं, तर अनेकांनी डिलीव्हरी बॉयच्या कामाचं कौतुक करताना दिसून आलं.
Web Title: Delivery Boy Saved Lives Dogs Get Stuck In Elevator Video Viral Ss01
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..