
राष्ट्रपतींनंतर श्रीलंकेला मिळाले नवे पंतप्रधान; दिनेश गुणवर्देनेंनी घेतली शपथ
Dinesh Gunawardena : श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्देना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित राष्टपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. तसेच त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. श्रीलंकेला अभूतपूर्व आर्थिक संकटातून सोडवण्याचा भार आता विक्रमसिंघे आणि गुणवर्देने यांच्या जोडीवर आहे. माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांचे सहकारी देश सोडून गेले आहेत.
दिनेश गुणवर्देने हे श्रीलंकेचे ज्येष्ठ राजकारणी, संसद सदस्य, माजी कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी यापूर्वी श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांना एप्रिलमध्ये गृहमंत्री केले होते. गेल्या आठवड्यात देशात प्रचंड गदारोळ आणि विरोध झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया यांनी कुटुंबासह देश सोडून पलायन केले होते. त्यानंतर, संसदेने गोटाबाया यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी रानिल विक्रमसिंघे यांची राष्ट्रपती म्हणून निवड केली आहे. विक्रमसिंघे हे सहा वेळा देशाचे पंतप्रधान राहिले आहेत.
सध्या श्रीलंकेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. देशाची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणावर खालावली असून, जीवनावश्यक वस्तू आणि इंधन आयात करण्यासाठीदेखील देशाकडे पैसे उरलेले नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या नव्या जोडीला देशाला या संकटातून बाहेर काढून पुन्हा रुळावर आणण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची आहे. विक्रमसिंघे यांनी वैयक्तिक हितसंबंध सोडून सर्व पक्षांना एकत्र येऊन संकटाचा सामना करण्याचे आवाहन केले आहे.