आंतरराष्ट्रीय करार रद्द करू नका - ओबामा

पीटीआय
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

अमेरिका आणि इराण या दोन देशांत केवळ अणू करार झालेला नसून, त्यात अमेरिकेचे निकटवर्ती अन्य देशही आहेत. करार रद्द केल्यास आपल्याला युरोपमधील देश, चीन, रशिया यांच्यावर निर्बंध लादावे लागतील. कारण ते कराराचे पालन कायम ठेवतील. त्यांच्या दृष्टिकोनातून इराण कराराप्रमाणे वागत आहे. 
- बराक ओबामा, अमेरिकेचे मावळते अध्यक्ष

वॉशिंग्टन - इराणसोबतचा आण्विक करार आणि पॅरीस तापमान बदल करार यासारखे आंतरराष्ट्रीय करार रद्द करू नयेत, असा सावधानतेचा इशारा अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला. मोठ्या परिश्रमानंतर हे ऐतिहासिक करार प्रत्यक्षात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले. 

व्हाइट हाउस येथे पत्रकार परिषदेत बोलताना ओबामा म्हणाले, ‘‘कोणीही सत्तेत आला तरी आंतरराष्ट्रीय करारांचे पालन करण्याची परंपरा आहे. ते आपल्या देशासाठी हितकारी असून, दुसऱ्या देशांवरही त्यांची बांधिलकी असल्याने अमेरिकेला यातून मदत होते. इराण अणू करारावर सुरू असलेली चर्चा आणि प्रत्यक्षातील वास्तव वेगवेगळे आहे. याचा बोध नव्या अध्यक्षांनी घ्यायला हवा. इराण अणू करार अस्तित्वात येण्याआधीच त्याच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. लोकशाही प्रक्रियेचा मला अभिमान आहे. दोन्ही बाजूंनी लोक म्हणणे मांडत होते. संसद आणि लोकांचे मन वळविण्यात आल्याने जनमतही कराराच्या पाठीशी आले.’’ 

‘‘सुरवातीला इराण कराराचे पालन न करता फसवणूक करेल, अशी चर्चा होती. वर्षभरातील परिस्थितीचा विचार करता इराणने कराराचे पालन केल्याचे दिसते. हे केवळ माझे मत नाही. या कराराला विरोध करणारे इस्त्रायली लष्करी व गुप्तचर अधिकाऱ्यांचेही असेच मत आहे. हीच बाब पॅरीस तापमान बदल कराराबाबतची आहे. हा करार रद्द करण्याबाबत चर्चा सुरू आहे. भारत आणि चीनसह प्रदूषण करणाऱ्या अन्य देशांनी एकत्र एका व्यासपीठावर यावे, हा या कराराचा उद्देश आहे. सर्वांनी मिळून एकत्रितपणे एकच काम करूया. कारण तापमान बदलाचा फटका आपल्यालाही मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्‍यता आहे,’’ असे ओबामा यांनी सांगितले. 

ट्रम्प यांच्या विजयाने असुरक्षितता
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्याने माझ्या मुलींपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, अशी कबुली पेप्सिको कंपनीच्या भारतीय वंशाच्या अध्यक्षा इंद्रा नुयी यांनी दिली. 

अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्या नुयी या समर्थक मानल्या जातात. येथे एका कार्यक्रमात बोलताना नुयी म्हणाल्या, ‘‘क्‍लिंटन यांच्या पराभवामुळे माझ्या मुली तसेच, पेप्सिकोचे कर्मचारी हताश झाले. यामध्ये प्रामुख्याने श्‍वेतवर्णीय नसलेल्या कामगारांचा समावेश करावा लागेल. ट्रम्प यांच्या विजयाने या सर्वांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. मला माझ्या मुली आणि कामगारांच्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागली. ते सर्व दु:खी आहेत. माझ्या कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर होत आहेत. विशेषत: श्‍वेतवर्णीय नसलेले प्रश्‍न उपस्थित करीत आहेत की, आम्ही येथे सुरक्षित आहोत? तसेच, समलिंगी नागरिकही सुरक्षिततेबद्दल प्रश्‍न विचारत आहेत.’’ 

Web Title: Do not cancel the international agreement