रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'

पीटीआय
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

आम्ही डोकलाममध्ये परिस्थितीनुसार योजना राबवण्यासाठी हवामानाबरोबरच प्रत्यक्ष वातावरणावर लक्ष ठेवू. त्यामुळे रस्ते काम थांबवणार का सुरूच ठेवणार, याबाबत चीनने संदिग्धता कायम ठेवली आहे

बीजिंग - डोकलामच्या मुद्‌द्‌यावरून भारत आणि चीन यांच्यातील वाद तब्बल अडीच महिन्यानंतर सोमवारी निवळला. मात्र, चीनने मंगळवारी डोकलाम येथील नियोजित रस्त्याचे काम बंद करणार की नाही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले की, सीमा भागाचे संरक्षण आणि स्थितीत सुधारणा करण्यासाठी चीन दीर्घकाळापासून पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. त्यात डोकलाम क्षेत्रातील रस्ते कामाचादेखील समावेश आहे. वादग्रस्त क्षेत्रातील कामाबाबत विचारले असता त्यांनी यासंदर्भात संदिग्ध उत्तर दिले. ते म्हणाले की, आम्ही डोकलाममध्ये परिस्थितीनुसार योजना राबवण्यासाठी हवामानाबरोबरच प्रत्यक्ष वातावरणावर लक्ष ठेवू. त्यामुळे रस्ते काम थांबवणार का सुरूच ठेवणार, याबाबत चीनने संदिग्धता कायम ठेवली आहे. काल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोकलाममधून दोन्ही देशाचे सैन्य मागे जाणार असल्याची माहिती दिली होती. त्यावर चीनने शिक्कामोर्तब केले होते. मात्र, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोकलाममध्ये गस्त सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

उमर अब्दुल्लांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन
श्रीनगर : डोकलाममधून चिनी सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडल्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. उमर यांनी ट्‌विटरवर म्हटले की, चीन हा एक शक्तिशाली देश आहे. मात्र, भारताने ज्या रीतीने कोणताही गाजावाजा न करत छातीठोकपणे चीनला मागे हटण्यास भाग पाडले, ते प्रशंसनीय आहे. डोकलाममध्ये वाद निर्माण होण्यापूर्वीची स्थिती बहाल करण्यासाठी चीनला तयार करणे यात देशाचा मोठा विजय आहे. हा भारताचा आणि पंतप्रधानांचा विजय आहे. कारण, चीन डोकलाममध्ये रस्त्याचे जाळे तयार करून भौगोलिक चित्र बदलण्याच्या तयारीत होता.

Web Title: doklam china road india