भारताची कोरोना लस मिळाल्याने डोमिनिकनचे PM भावुक; शेअर केला खास मेसेज

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 10 February 2021

कोरोना विषाणू महामारीवर मात करण्यासाठी भारतात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे

नवी दिल्ली- कोरोना विषाणू महामारीवर मात करण्यासाठी भारतात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. भारताने दुसऱ्या देशांनाही लसीचा पुरवठा सुरु केला आहे. भारताने आतापर्यंत अनेक देशांना गिफ्ट म्हणून लस दिली आहे. भारताची कोरोना लस डोमिनिकन गणराज्य देशात पोहोचली आहे. देशात कोरोनाची लस पोहोचल्यानंतर तेथील पंतप्रधान रुजवेल्ट स्केरिट भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील लोकांचे आभार मानले. 'न्यूज 18' ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

भारत-चीन सीमेवर मोठी घडामोड; उभय देशांच्या सैनिकांची सीमा भागातून माघार

कोरोना लस मिळाल्यानिमित्त डोमिनिकनमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पीएम रुजवेल्ट म्हणाले की, मला कल्पनाही नव्हती की आमच्या विनंतीनंतर इतक्या कमी वेळात प्रतिसाद मिळेल. कोरोनाच्या भयंकर संकटात सर्वांना आपल्या लोकांची आणि देशाची काळजी वाटते. पण, पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या प्रयत्नामुळे अन्य देशांनाही मदत मिळत आहे. त्यांनी डोमिनिकनलाही मदतीचे आश्वासन दिले होते. 

पंतप्रधान रुजवेल्ट स्केरिट म्हणाले की, भारताकडून 35000 लसीचे डोस मिळाले आहेत. देशाची लोकसंख्या 72 हजार आहे. भारताने केलेल्या मदतीमुळे देशातील अर्ध्या लोकांचे संरक्षण होईल. भारताने केलेल्या या मदतीमुळे मी त्यांचे आभार मानतो. 

'...आता हे जास्त होत आहे'; लोकसभेत PM मोदी काँग्रेस नेत्यावर भडकले

लशीचा स्टॉक घेण्यासाठी पंतप्रधान स्वत: पोहोचले विमानतळावर

9 फेब्रुवारीला डोमिनिका डगलस-चार्ल्स विमानतळावर भारताची कोरोना लस पोहोचली. लशीचा स्टॉक रिसिव्ह करण्यासाठी पंतप्रधान रुजवेल्ट स्केरिट स्वत: विमानतळावर पोहोचले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्री मंडळातील अन्य नेतेही उपस्थित होते. स्वत: पीएम आणि त्यांच्या मंत्र्यांनी लशीचे बॉक्स विमानाबाहेर काढण्यासाठी मदत केली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.  

भारतातील लसीकरण मोहीम

भारतातील लसीकरण मोहीम प्रगतीपथावर आहे. देशात 16 जानेवारीला लसीकरण सुरु करण्यात आले होते. आतापर्यंत देशात 68,26,898 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 56,65,172 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव मनदीप भंडारी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dominican republic share emotional message india corona vaccine