भारत-चीन सीमेवर मोठी घडामोड; उभय देशांच्या सैनिकांची सीमा भागातून माघार

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 10 February 2021

चीनने बुधवारी मोठी घोषणा केली आहे.

बिजिंग- चीनने बुधवारी मोठी घोषणा केली आहे. भारत आणि चीनचे सैन्य पैंगोग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यापासून माघार घेत आहे. या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले होते. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, 24 तारखेला कमांडर स्तरावर झालेल्या चर्चेदरम्यान बनलेल्या सहमतीनुसार दोन्ही देशाच्या सैनिाकांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. 

चिनी मिनिस्ट्री ऑफ डिफेंस नॅशनल डिफेंसचे प्रवक्ता कर्नल वु क्यान यांनी बुधवारी लिखित स्वरुपातील निवेदन सादर करत सांगितलं की, चीन आणि भारताच्या फ्रंट लाईन सैनिकांनी उत्तर आणि दक्षिण पैंगोग त्सो तलावापासून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीनच्या दरम्यान चर्चेची नववी फेरी पार पडली. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांनी माघार घेण्यावर सहमती दर्शवली. ग्लोबल टाईम्य या चिनी सरकारच्या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

भारतीय सैन्यातील सूत्रांनुसार पैंगोग त्सोसह प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अन्य भागातून सैनिकांना मागे घेण्यावर सहमती झाली आहे. तसेच जवानांना या भागातून माघार घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्याची घडामोड सकारात्मक मानली जात आहे. चीनकडून पहिल्यांदाच या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. 

...आता हे जास्त होत आहे'; लोकसभेत PM मोदी काँग्रेस नेत्यावर भडकले

5 मे रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. त्यानंतर 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तमय संघर्ष झाला. अनेक दशकानंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली होती. संघर्षात दोन्ही देशांना नुकसान झाले होते. भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनचे 40 सैनिक मारले गेले असल्याची माहिती भारत सरकारने दिली होती. असे असले तरी चीनने आपल्या सैनिकांच्या मृत्यूचा आकडा जाहीर केलेला नाही. 

दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. दुसरीकडे सीमेवर चीनने मोठ्या प्रमाणात सैनिकांची तैनाती केली. भारताने प्रत्युत्तर म्हणून 50 हजार सैनिक सीमेवर तैनात केले. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही सीमेवर आणण्यात आला. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India China start pulling back tanks from southern bank of Pangong Lake