मास्क लावून डोनाल्ड ट्रम्प रुग्णालयात दाखल, VIDEO शेअर करून दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर शुक्रवारी ट्रम्प व्हाइट हाऊसबाहेर आले. एरवी मास्क घालण्याला विरोध करणारे आणि खिल्ली उडवणारे ट्रम्प मास्क घालून वॉल्टर रिव्हर लष्करी रुग्णालयात दाखल झाले.

वाशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोनाची लागण झाल्यानंतर ते क्वारंटाइन झाले होते मात्र खबरदारी म्हणून उपचार घेण्यासाठी ते रुग्णालयात गेले आहेत. आपण ठीक असल्याचं त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीला एक महिना उरला असतानाच ट्रम्प यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर शुक्रवारी ट्रम्प व्हाइट हाऊसबाहेर आले. एरवी मास्क घालण्याला विरोध करणारे आणि खिल्ली उडवणारे ट्रम्प मास्क घालून वॉल्टर रिव्हर लष्करी रुग्णालयात दाखल झाले. 

दरम्यान, रुग्णालयात दाखल होण्याआधी व्हाइट हाउसमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ट्रम्प म्हणाले की, मला रुग्णालयात दाखल केलं जात आहे. तर प्रेस सचिव कायले मॅकनेनी यांनी सांगितलं की, ट्रम्प यांना पुढच्या काही दिवसांसाठी वॉल्टर रीडमध्ये दाखल कऱण्यात येत असून तिथूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

हे वाचा - महिला खासदाराची कोरोना असूनही संसदेत एन्ट्री; पक्षातून हकालपट्टी

डोनाल्ड ट्रम्प पुढचे काही दिवस कोरोनावर उपचार घेणार आहेत. मात्र याकाळात ते काम सुरूच ठेवतील अशीही माहिती देण्यात आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 

ट्रम्प यांच्या कँपेन मॅनेजरने शुक्रवारी म्हटलं होतं की, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निव़डणुकीआधी ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेच्या कार्यक्रमांना स्थगित केलं जाईल किंवा व्हर्च्युअल आयोजन केलं जाईल. जिथं ट्रम्प यांची उपस्थिती असणार होती तिथं ट्रम्प व्हर्च्युअल हजेरी लावणार आहेत.

हे वाचा - अद्दल घडली का? ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चीनने उडवली खिल्ली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह पत्नी मेलानिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी ट्रम्प यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती. त्याआधी ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतरच ट्रम्प यांच्यासह मेलानिया यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump admitted in walter river hospital for covid treatment