'कुणीच कल्पना केली नव्हती अशी गोष्ट आम्ही केली', कोरोना लशीबद्दल ट्रम्प यांची मोठी घोषणा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

जगात आतापर्यंत अडीच कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जवळपास साडेआठ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक 62 लाख कोरोनाचे रुग्ण आढळले असून मृतांचा आकडाही 1 लाख 87 हजार इतका आहे.

वॉशिंग्टन - जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील अनेक देश संशोधन करत आहेत. जगात पहिल्यांदा कोरोनावर लस तयार केल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाने लस तयार केली असून स्वत:च्या मुलीला ती टोचली असल्याचं सांगितलं होतं. मात्र जगभरातून या लसीबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे.

AstraZeneca ही कोरोना लस सध्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच ट्रायलची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याला मंजुरी मिळेल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. व्हाइट हाउसमधून घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला या गोष्टीचा आनंद आहे की एस्ट्राजेनेका लस ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. लवकरच या लशीला मंजुरी मिळू शकते. 

AstraZeneca ही सध्या जगात कोरोना व्हॅक्सिनच्या शर्यतीत सर्वात पुढे असलेल्या व्हॅक्सिनपैकी एक आहे. रशियाने पहिल्या लशीनंतर दुसऱी लस सुद्धा तयार केल्याचा दावा केला आहे. याची घोषणाही करण्यात आली आहे. असे असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार जर कोरोना व्हॅक्सिनला मंजुरी मिळाली तर लवकरच कोरोनातून सुटका होऊ शकेल. जगभरात कोरोनाने हाहाकार उडाला आहे. सर्वाधिक परिणाम अमेरिकेवर झाला असून सध्या AstraZeneca शिवाय Moderna Inc आणि Pfizer Inc या लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. 

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही अशी गोष्ट करत आहोत ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. लोकांना व्हॅक्सिन तयार करण्यासाठी काही वर्षे लागायचे. मात्र आम्ही काही महिन्यांतच ही गोष्ट करणार आहोत. अमेरिकेनं कोरोनाला आटोक्यात आणल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. गेल्या एक महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत 38 टक्के घट झाली आहे. 

हे वाचा - काय सांगता! कोणतेही औषध न घेता HIV रुग्ण झाला बरा

जगात आतापर्यंत अडीच कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जवळपास साडेआठ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक 62 लाख कोरोनाचे रुग्ण आढळले असून मृतांचा आकडाही 1 लाख 87 हजार इतका आहे. भारतातही सध्या कोरोनाचे दरदिवशी 65 ते 75 हजार इतके नवे रुग्ण आढळत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump announced AstraZeneca s vaccine Phase 3 clinical trials