गड्याला गांभीर्यच नाही! कोरोनासंबंधी बैठक टाळून ट्रम्प गेले गोल्फ खेळायला

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 22 November 2020

कोरोना संसर्गाशी लढा देण्याबाबत अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किती गंभीर आहेत, याचा प्रत्यय शनिवारी आला.

वॉशिंग्टन- कोरोना संसर्गाशी लढा देण्याबाबत अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किती गंभीर आहेत, याचा प्रत्यय शनिवारी आला. सध्या सुरू असलेल्या जी २० देशांच्या परिषदेत कोरोना विरोधातील लढाईचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष सत्राला दांडी मारत ट्रम्प गोल्फ खेळण्यासाठी गेले.

कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत असताना आणि सर्वाधिक हानी अमेरिकेचीच झाली असताना ट्रम्प यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे वारंवार दिसून आले आहे. मास्क घालण्यास विरोध, टाळेबंदीला विरोध, ती उठवण्याची केलेली घाई अशी काही त्यांच्या वर्तणुकीची उदाहरणे आहेत. काल जी २० परिषदेत ट्रम्प यांनी सकाळी भाषण केले. या भाषणात त्यांनी कोरोना विरोधात सर्वांनी एकत्रितपणे लढण्याची गरज व्यक्त केली. त्यानंतर काही वेळ ते अध्यक्षीय निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप ट्विटरवरून करत होते. परिषदेत असलेल्या आढावा सत्राकडे पाठ फिरवून थोड्याच वेळात ते आपल्या खासगी गोल्फ मैदानावर खेळताना दिसत होते.

पाकिस्तान सीमेवर मिळाली भुयार; ''नगरोटात आलेले दहशतवादी येथूनच आले...

आपण दीर्घकाळ काम करू

जी २० परिषदेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी, कोरोनावर विजय मिळवतानाच आपण अर्थव्यवस्थेच्या वाढीकडे आणि रोजगारनिर्मितीकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे म्हटल्याचे व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सर्व जगाने या संकटाविरोधात आक्रमक कृती करावी असे आवाहनही त्यांनी केले. तुमच्या सर्वांबरोबर काम करताना आनंद वाटला , यापुढेही दीर्घकाळ काम करू, असेही ट्रम्प यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. व्हाईट हाऊसच्या निवेदनात हे वाक्य नव्हते.

गुलाम नबी आझादांनी काँग्रेसच्या पराभवावर सोडलं मौन; 72 वर्षातील सर्वात वाईट...

निष्फळ न्यायालयीन लढाया

निवडणुकीतील आपला पराभव अद्यापही मान्य न करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची न्यायालयाच्या मार्फत निकाल फिरवण्याची धडपड सुरूच आहे. त्यांनी आणि रिपब्लिकन पक्षाच्या इतर नेत्यांनी देशभरात ३० ठिकाणी निकालाविरोधात दावे दाखल केले आहेत. यातील अनेक ठिकाणी न्यायालयाने दावे फेटाळले आहेत. कालच ट्रम्प गोल्फ खेळत असतानाच पेनसिल्वानिया राज्यातील न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी ट्रम्प यांची याचिका फेटाळून लावली. मात्र, यामुळेही ट्रम्प समर्थक खचून गेले नसून, ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संधी आहे, असे म्हणत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump avoid corona meeting during g20