डोनाल्ड ट्रम्प यांना दिलं जात आहे रेमडेसिवीर औषध; 11 दिवसांत बरे होतात रुग्ण

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 4 October 2020

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर वाल्टर रीड आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

वॉशिंग्टन डी.सी.- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर वाल्टर रीड आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या ट्रंप यांना रेमडेसिवीर औषध दिलं जात आहे. या औषधांबद्दल असं सांगितलं जात आहे की, याच्या सेवनाने कोरोना रुग्ण 11 दिवसांत बरे होण्यास मदत होत आहे. अमेरिकेत रेमडेसिवीर औषधाचे कोरोना रुग्णांवर चांगले परिणाम दिसून आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, रेमडेसिवीर Experimental Ebola drug Remdesivir) हे औषध इबोला व्हायरसविरुध्द पहिल्यांदा तयार केलं होतं, आता त्याचा सकारात्मक परिणाम कोरोनाविरुध्द लढताना दिसत आहे. 

राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या मते, रेमडेसिवीर ज्या कोरोना रुग्णांना दिलं जात आहे ते सरासरी 11 दिवसांत बरे होत आहेत. या औषधामुळे कोरोना रुग्ण सरासरीच्या चार दिवस अगोदर बरे होत आहेत. एफडीएने गिलियड साइंसेज इंक (Gilead Sciences Inc) द्वारे विकले जात असलेले हे ऍंटीव्हायरल आपतकालीन काळात वापरण्यास परवानगी दिली आहे. 

हेही वाचा - क्रिकेटपटूला कारची जोरात धडक; गंभीर जखमी झाल्याने कोमात
 
24 तासात तब्येतीत सुधारणा
ट्रम्प यांच्यावर उपचार करणाऱ्या मेडिकल टिमने म्हटलंय की, त्यांना श्वास घेण्यासंबधी कसलीही समस्या नाहीये. त्यांना ऑक्सिजन देण्याचीही काही गरज नाहीये. या टिमने म्हटलंय की ट्रम्प ठिक आहेत मात्र पुढचे 48 तास त्यांच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहेत. या टिममधील डॉक्टर सीन कॉल्ने यांनी म्हटलंय की ट्रम्प आपल्या अंथरुणातून उठून थोडं चालले देखील. त्यांना या 24 तासादरम्यान ताप, कफ, बंद नाक आणि कणकण यासारखी कोणतीही लक्षणे नव्हती. 

हेही वाचा - मास्कमुळे घातक वायू तयार होत नाही; संशोधकांचे स्पष्टीकरण

व्हाईट हाऊसमध्ये क्वारंटाईन आहेत मेलानिया
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानियादेखील कोरोना व्हायरसमुळे संक्रमित आहेत. ट्रम्प यांचा उपचार वाल्टर रीड आर्मी हॉस्पिटलमध्ये सुरु आहे. तर मेलानिया व्हाईट हाऊसमध्येच सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. ट्रम्प कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं शुक्रवारी समजलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडीओ देखील ट्विट केला होता, ज्यात त्यांनी आपल्यासोबत आपली पत्नीदेखील कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं कळवलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की त्यांची आणि त्यांच्या पत्नीची कोरोना टेस्ट ही पॉझिटीव्ह आली आहे. व्हाईट हाऊसने सुचना देताना म्हटलं होतं की त्यांना थोडी थकल्यासारखं वाटतंय मात्र ते आशावादी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump is being given Remdesivir corona Patients are recovering in 11 days on average