"डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदासाठी अयोग्य उमेदवार"

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 18 August 2020

अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसत आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसत आहे. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लकिन पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका-टीप्पणी सुरु केली आहे. सोमवारी अमेरिकी डेमोक्रेट अधिवेशनाची सुरुवात झाली. या अधिवेशनाला अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी म्हणजे माजी अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी संबोधित केले. यावेळी मिशेल यांनी आपल्या भाषणातून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती होण्यास लायक नाहीत, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

Corona Updates: देशातील सहा राज्यांमध्ये कोरोनाचा कहर; महाराष्ट्रातील आकडे...

डोनाल्ड ट्रम्प अयोग्य राष्ट्रपती आहेत. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सहानभूती दिसून येत नाही, असं मिशेल म्हणाल्या आहेत. जेव्हा नेतृत्व, सांत्वना किंवा स्थिरतेच्या आशेने आपण व्हाईट हाऊसकडे पाहतो, त्यावेळी विभाजन, अराजकता आणि सहानुभूतीचा अभाव दिसून येतो, अशी टीका त्यांनी केली आहे. मिशेल पुढे म्हणाल्या की, मला पूर्ण प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे म्हणायचं आहे की डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशासाठी चुकीचे उमेदवार आहेत. 

अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहे. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदासाठी समोरासमोर आहेत. जो बायडेन माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उप-राष्ट्रपती होते. यावेळी ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. बायडेन यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उप-राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून निवडलं आहे. हॅरिस एका मोठ्या पक्षाने उप-राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिलेल्या पहिल्या आशियाई महिला ठरल्या आहेत. त्या सध्या कॅलिफोर्नियाच्या सिनेटर आहेत. 

फेसबुक-भाजप युतीच्या गौप्यस्फोटाची संसदीय चौकशी करा; काँग्रेसची मागणी
 

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदावर विराजमान होण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र, यावेळी त्यांचा मार्ग खडतर दिसत आहे. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना महामारीने प्रभावित झालेल्या देशांमध्ये अमेरिकेला पहिला क्रमांक आहे. ट्रम्प कोरोना महामारीला हाताळण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. दुसरेकडी आर्थिक पातळीवर अमेरिकेची पिछाडी होत आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था डबगाईला आली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात वातावरण तयार झालं आहे. शिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या सर्वेक्षणामध्ये ट्रम्प यांची पिछाडी होताना दिसत आहे. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump is an ineligible candidate for the presidency