esakal | अमेरिकन लोकांसाठी पॅकेजला मंजुरी द्यायची सोडून ट्रम्प गेले गोल्फ खेळायला
sakal

बोलून बातमी शोधा

trump golf

ट्रम्प यांनी  आर्थिक संकटात सापडलेल्या अमेरिकन लोकांसाठीच्या सहाय्यता आणि सरकारी फंडिंग बिलावर सही न करता मधेच सोडून पाम बिचवर सुट्टी साजरी करण्यात धन्यता मानली.

अमेरिकन लोकांसाठी पॅकेजला मंजुरी द्यायची सोडून ट्रम्प गेले गोल्फ खेळायला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

फ्लोरिडा - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अद्यापही त्यांचा हट्टीपणा सोडत नसल्याचं दिसत आहे. अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक दणका बसल्यानंतर नागरिकांच्या हितासाठी काही निर्णय सरकार घेत आहे. मात्र दुसऱ्या बाजुला ट्रम्प आपल्या जबाबदाऱ्या सोडून गोल्फ खेळत ख्रिसमस साजरा करताना दिसत आहेच. ट्रम्प यांनी  आर्थिक संकटात सापडलेल्या अमेरिकन लोकांसाठीच्या सहाय्यता आणि सरकारी फंडिंग बिलावर सही न करता मधेच सोडून पाम बिचवर सुट्टी साजरी करण्यात धन्यता मानली.

ट्रम्प यांच्या अशा वागण्यामुळे लाखो अमेरिकन लोकांना मदतीचा चेक मिळणार नाही आणि असं झालं तर कोरोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांच्या अडचणीत वाढ होईल. व्हाइट हाऊसने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती अद्याप दिलेली नाही. दरम्यान, ट्रम्प हे दक्षिण कॅरोलिनाचे सीनेटर लिंडसे ग्राहम यांच्यासोबत शुक्रवारी गोल्फ खेळताना दिसले.

हे वाचा - कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत ब्रिटनचे दावे खोटे; आफ्रिकेच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

व्हाइट हाउसचे प्रवक्ते झेड डिअर यांनी सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना शुक्रवारी सकाळी नॅशविले शहरात झालेल्या स्फोटाची माहिती दिली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोट जाणीवपूर्वक घडवून आणल्याचं सांगितलं आहे. मात्र ट्रम्प यांनी अनेक तास यावर मौन बाळगलं होतं. त्यांनी सार्वजनिकपणे प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. 

वर्षाच्या शेवटी आलेल्या स्पेंडिग बिलामध्ये सर्वसामान्य अमेरिकन लोकांना 600 डॉलर ऐवजी 2 हजार डॉलरचा चेक देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यावर अद्याप ट्रम्प यांच्या पक्षाच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या होणं बाकी आहे. सध्या ट्रम्प यांच्यामुळे बिल अधांतरी आहे. 1.4 ट्रिलियन डॉलरच्या या बिलावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला तर फेडरल सरकारला मोठं नुकसान सहन करावं लागेल. सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या चेकसह बेरोजगारांना देण्यात येणारी मदतही यामुळे थांबणार आहे. 

हे वाचा - कोरोना विषाणूचा नवा प्रकार जास्त घातक; मृतांची संख्या वाढणार?

कोरोनाच्या संकटात दिल्या जाणाऱ्या मदतीला रोखण्याचा हा प्रकार म्हणजे ट्रम्प यांच्याकडून केलं जाणारं राजकारण असल्याचं म्हटलं जात आहे.  ट्रम्प यांच्याकडून सातत्यानं मतदानात भ्रष्टाचार झाल्याचं सांगत निकालाविरोधात वक्तव्ये केली जात आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवानंतरही त्यांनी अजुनही निकाल थेट स्वीकारलेला नाही. मतदारांनी नाकारल्यानेच आता ट्रम्प अशा प्रकारची खेळी करत असल्याची चर्चा सध्या आहे.

loading image
go to top