कोरोना लशीची घोषणा करणाऱ्या फायझर कंपनीवर ट्रम्प भडकले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

फायझर या औषध निर्माण कंपनीने ते करत असलेल्या लशीची परिणामकारकता ९० टक्के असल्याचे काल जाहीर केले. या लशीमुळे शरीरातील कोरोना विषाणूचा प्रादर्भाव मोठ्या प्रमाणात रोखता येतो, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. 

वॉशिंग्टन - कोरोना विषाणूविरोधात तयार होत असलेल्या लशीला यश मिळत असल्याचे ‘फायझर’ आणि अन्न व औषध प्रशासनाने दडवून ठेवले, त्यामुळे कोरोना या मुद्यावरून मत मिळविण्याची आपली संधी हुकली, असा संताप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्यक्त केला. ‘या लशीच्या आधारावर मला विजय मिळावा, असे त्यांना वाटतच नव्हते. त्यामुळे मी जे गेले दोन महिने सांगत होतो, ते त्यांनी मतदानानंतर आठवडाभराने सांगितले,’ असे ट्वीट ट्रम्प यांनी केले आहे.

फायझर या औषध निर्माण कंपनीने ते करत असलेल्या लशीची परिणामकारकता ९० टक्के असल्याचे काल जाहीर केले. या लशीमुळे शरीरातील कोरोना विषाणूचा प्रादर्भाव मोठ्या प्रमाणात रोखता येतो, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत कोरोनाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. ट्रम्प प्रशासनाला संसर्गस्थिती हाताळता आली नाही, असा दावा करत डेमोक्रॅटिक पक्षाने मात्र आपली सर्व योजना तयार असल्याचे सांगितले होते.

सर्वाधिक संसर्ग आणि सर्वाधिक मृत्यू असलेल्या अमेरिकेत या मुद्याचा चांगलाच प्रभाव पडला. चाचणी अंतिम टप्प्यात आली असून यश मिळत आहे, असे ट्रम्प यांनी वारंवार सांगितले होते. या पार्श्वभूमीवर ‘फायझर’ने लशीबाबत मतदानानंतर घोषणा केल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. ‘ज्यो बायडेन अध्यक्ष असते तर पुढील चार वर्षे लस मिळाली नसती. आम्ही या चाचण्यांना तत्काळ मान्यता दिली होती. मात्र मला त्यांना जिंकूच द्यायचे नव्हते. राजकीय कारणांसाठी नव्हे, तर हजारो जणांचे जीव वाचविण्यासाठी तरी लशीची आधीच घोषणा होणे आवश्‍यक होते,’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

हे वाचा - अमेरिकेच्या कोरोना लशीने दिलेय चांगली बातमी, पण भारताला कधी मिळणार?

दरम्यान, ट्रम्प यांनी आपली हात मानण्यास आजही नकार दिला आहे. त्यांच्या पक्षाच्या दहा ॲटर्नी जनरलनी आज सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करताना टपालाद्वारे मतदान करण्याची परवानगी देणारा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवावा, अशी मागणी केली आहे. नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मात्र, आपले संभाव्य मंत्रिमंडळ आणि ‘व्हाइट हाउस’मधील कर्मचारी यांच्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. बायडेन यांच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास घडवू, असा विश्‍वास नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump reaction on pfizer vaccin anouncement