निवडणूक अधिकाऱ्याची ट्रम्प यांच्याकडून गच्छंती; सुरक्षा अधिकारी क्रेब्सवर कुऱ्हाड

वृत्तसंस्था
Thursday, 19 November 2020

क्रेब्स यांची नियुक्ती ट्रम्प यांनीच केली होती. क्रेब्स यांचे मतमोजणी योग्य असल्याचे विधान ट्रम्प यांनी फेटाळून लावले. ट्‌विटद्वारेच ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर केला.

वॉशिंग्टन - अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक इतिहासातील सर्वांत सुरक्षित असल्याचा निर्वाळा देणाऱ्या अधिकाऱ्याची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गच्छंती केली आहे. सायबर आणि पायाभूत सुविधा सुरक्षा संस्थेचे (सीआयएसए) प्रमुख ख्रिस क्रेब्स यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर केला.

ज्यो बायडेन यांच्याविरुद्ध पराभव झाल्याचे ट्रम्प यांना अमान्य आहे. मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा त्यांचा दावा असून त्यांनी अद्याप कोणताही पुरावा दिलेला नाही.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

क्रेब्स यांची नियुक्ती ट्रम्प यांनीच केली होती. क्रेब्स यांचे मतमोजणी योग्य असल्याचे विधान ट्रम्प यांनी फेटाळून लावले. ट्‌विटद्वारेच ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर केला.

क्रेब्स पूर्वी मायक्रोसॉफ्टमध्ये होते. त्यांनी या घडामोडीबद्दल कोणताही खेद वाटत नसल्याचे सांगितले. २०१६च्या निवडणूकीत रशियाने ढवळाढवळ केल्याचे आरोप झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर दोन वर्षांपूर्वी ‘सीआयएसए’ ही संस्था निर्माण करण्यात आली. स्थापनेपासून क्रेब्स या संस्थेवर होते. निवडणूक निकालाविषयी अगदी अध्यक्षांनी जरी काही दावे केले तरी त्यावर विश्‍वास ठेवू नये असे क्रेब्स यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच ट्रम्प यांचा रोष ओढवून घेतल्याचे मानले जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी दोघांचा नंबर
संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांची ट्रम्प यांनी यापूर्वीच हकालपट्टी केली होती. त्यांच्या निष्ठेबाबत ट्रम्प यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. आता जानेवारीत पद सोडण्यापूर्वी ट्रम्प ‘सीआयए’च्या संचालिका जीना हॅस्पेल आणि ‘एफबीआय’चे संचालक ख्रिस्तोफर व्राय यांच्यावर कुऱ्हाड चालवण्याची दाट शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump rejected Krebs statement that the count was correct