
कॅपिटल हिल दंगलीच्या (Capitol Hill Riots) आरोपाखाली ट्रम्प यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली होती.
'I’m Back' : बंदी उठल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा फेसबुक, यूट्यूबवर परतले; लिहिली पहिली पोस्ट..
सोशल मीडियावरील (Social Media) बंदी उठवल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा परतले आहेत.
दोन वर्षांहून अधिक काळ बंदी घालल्यानंतर ट्रम्प यांची सोशल मीडिया खाती नुकतीच पुन्हा सुरू करण्यात आली. आता त्यांनी फेसबुकवर (Facebook) पहिली पोस्ट लिहिलीये.
ट्रम्प यांनी शुक्रवारी उशिरा फेसबुक आणि यूट्यूब खात्यांवर आपली पहिली पोस्ट लिहिली. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक (US Presidential Election) जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं मानलं जात आहे. ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट काही महिन्यांपूर्वी रिस्टोअर करण्यात आलं होतं.
कॅपिटल हिल दंगलीच्या (Capitol Hill Riots) आरोपाखाली ट्रम्प यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली होती. आता दोन वर्षांहून अधिक काळ बंदीचा सामना केल्यानंतर, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं त्याच्यावरील बंदी उठवलीये, त्यामुळं ते पूर्ण सक्रिय मोडमध्ये आहेत.
आपल्या पहिल्या फेसबुक पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिलंय, मी परत आलो आहे (I’m back). त्याचवेळी, ट्रम्प यांनी यूट्यूबवर 12 सेकंदांची व्हिडिओ क्लिप शेअर करताना त्याच शब्दांची पुनरावृत्ती केलीये. हा व्हिडिओ 2016 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत विजयानंतर ट्रम्प यांचं विजयी भाषण आहे.
76 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडणुकीसाठी उभे आहेत, त्यांचे फेसबुकवर 34 दशलक्ष फॉलोअर्स आणि यूट्यूबवर 2.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. कॅपिटल हिल दंगलीनंतर काही दिवसांनी 6 जानेवारी 2021 रोजी ट्रम्प यांच्यावर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली होती.