पत्रकारांशी वार्तालापाला ट्रम्प यांची पाठ

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

ट्रम्प आणि अमेरिकेतील माध्यमांमध्ये पूर्वीपासूनच तणाव आहे. ट्रम्प प्रशासन आणि अमेरिकेतील माध्यमे यांच्यातील वाद अद्यापही मिटला नसल्याचे यामुळे सिद्ध झाले आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षांचे सरकारी निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसतर्फे आयोजित पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांनी आज (रविवार) ट्विटरद्वारे या वार्तालाप कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगितले. आपल्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा, असे त्यांनी म्हटले होते. ट्रम्प आणि अमेरिकेतील माध्यमांमध्ये पूर्वीपासूनच तणाव आहे. ट्रम्प प्रशासन आणि अमेरिकेतील माध्यमे यांच्यातील वाद अद्यापही मिटला नसल्याचे यामुळे सिद्ध झाले आहे.

व्हाईट हाऊसने दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन आणि बीबीसीसारख्या मोठ्या वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींना परवानगी नाकारण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांना अमेरिकेचे शत्रू असल्याचे म्हटले होते. त्यानंतर वार्तालापासाठी 'व्हाइट हाऊस'ने केवळ निवडक पत्रकारांनाच निमंत्रित केले. इतर माध्यमांच्या पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने पुन्हा ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात येत होती. अखेर ट्रम्प यांनीच यावर्षी आपण वार्तालाप कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे.

Web Title: Donald Trump Says he Won't Attend White House Correspondents Dinner This Spring