"भारत-चीन संघर्ष झाल्यास डोनाल्ड ट्रम्प भारताला साथ देणार नाहीत"

कार्तिक पुजारी
Saturday, 11 July 2020

चीन आणि भारतामध्ये सीमावाद उभाळला तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताला साथ देण्याची शक्यता नाही, असं अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन म्हणाले आहेत. बोल्टन एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

वॉशिंग्टन- चीन आणि भारतामध्ये सीमावाद उभाळला तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताला साथ देण्याची शक्यता नाही, असं अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन म्हणाले आहेत. बोल्टन एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हाँगकाँगमधून जीव वाचवून अमेरिकेत आलेल्या वैज्ञानिकाचा चीनबाबत धक्कादायक खुलासा
चीन आपल्या सीमा भागात दादागिरी करत आहे. विशेष करुन पूर्व आणि दक्षिण समुद्रात जपान आणि भारतासोबतचे चीनचे संबंध बिघडले आहेत. भारत आणि चीन संबंध आणखी ताणले गेले तर ट्रम्प काय करतील हे निश्चित सांगता येत नाही. पण ट्रम्प चीनसोबत असलेले भौगोलिक संबंध नक्कीच लक्षात घेतील, असं बोल्टन म्हणाले आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांची नोव्हेंबरमधील निवडणुका पार पडल्यानंतर काय भूमिका असेल याबाबत काही सांगता येणार नाही. कदाचित ते चीनसोबत पुन्हा पूर्वीसारखा व्यापार सुरु करतील. भारत-चीनमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली तर ते भारताला मदत करण्याची शक्यता कमी असल्याचंही ते म्हणाले आहेत. ट्रम्प यांना भारत आणि चीनमधील वादाचा इतिहासही माहित नाही, असंही ते म्हणाले आहेत.

पुणे लॉकडाऊनवरून गिरीश बापट अजित पवारांवर बरसले
जॉन बोल्टन यांनी ट्रम्प यांच्या सरकारमध्ये एप्रिल 2018 ते सप्टेंबर 2019 पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी(NSA) काम केलं आहे.  पुढील चार महिने ट्रम्प कोणतंही पाऊल उचलणार नाहीत, जे त्यांना विजयापासून दूर घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे भारत आणि चीन सीमावादावर कोणतीही बातमी नसणं हेच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये 15 जून रोजी पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनने आपली जीवितहानी जाहीर करण्यास नकार दिला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध स्फोटक बनले होते. उभय देशांनी सीमा भागात सैनिकांची जुळवाजुळव सुरु केली होती. जवळजवळ 30 हजार सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र, सध्या दोन्ही देशांमधील तणाव निवळल्याचं चित्र आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump will not support india if there clash between india-china