'आम्ही नाही जा', ट्रम्प यांचा हेका कायम; बायडन यांच्या शपथविधीला राहणार अनुपस्थित

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

अमेरिकेमध्ये तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत  पराभूत झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव स्विकारला नाहीये.

विलमिंगटन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल शुक्रवारी घोषणा केलीय की ते नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथ ग्रहण समारोहा रोजी उपस्थित राहणार नाहीयेत. येत्या 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांचा शपथविधी समारोह आहे. बायडन यांनी त्यांच्या या भुमिकेचं उलट स्वागतच केलं आहे आणि म्हटलंय की ही चांगली गोष्ट आहे. बायडन विलमिंगटनमधून पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी म्हटलं की, इथे येताना रस्त्यात असताना त्यांना सांगितलं गेलंय की ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की ते शपथविधी समारोहाला गैरहजर राहणार आहेत.

बायडन यांनी म्हटलंय की, अशा खूप कमी गोष्टी आहेत ज्यावर मी आणि ट्रम्प सहमत असू. अलिकडेच घडलेल्या घटनांमुळे ते देशासाठी लज्जास्पद ठरले आहेत. त्यांचं शपथग्रहण समारोही रोजी न येणंच चांगली गोष्ट आहे. त्यांनी पुढे म्हटलं की ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत अक्षम अशा राष्ट्राध्यक्षांपैकी एक आहेत.

हेही वाचा - ट्रम्प यांच्या ट्विटरला मुसक्या; 'हिंसक टिवटिव'ची शक्यता वर्तवून अकाऊंट कायमचं बंद

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटलं की ते देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या 20 जानेवारी रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीयेत. ट्रम्प यांनी सत्तेचे सुलभ, सुव्यवस्थित आणि अखंड असे हस्तांतर करण्याची भुमिका जाहीर केली होती. त्यांनंतर ट्रम्प यांनी ट्विट केलंय की, ज्या लोकांनी मला याबाबत विचारलं होतं, त्यांना मी सांगू इच्छितो की मी 20 जानेवारीच्या शपथविधी समारंभामध्ये समाविष्ट होणार नाहीये.

हेही पहा - अमेरिकेतील US Capitol मध्ये नेमकं काय आणि का घडलं? 

अमेरिकेमध्ये तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत  पराभूत झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव स्विकारला नाहीये. मीच जिंकलो असून निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाला असल्याची हेकेखोर भुमिका त्यांनी घेतली होती. त्यांच्या या ताठर भुमिकेमुळे गेल्या बुधवारी त्यांच्या समर्थकांनी US Capitol वर हल्लाबोल केला. या घुसखोरीत चार जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या इतिहासात ही घटना अभुतपूर्व अशी होती. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या महाभियोग प्रक्रिया चालवण्याची चर्चा सध्या सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump Wont Attend Inauguration President elect Joe Biden