रुग्णालयाची माणुसकी! गरीब पेशंटचे माफ केले 1 कोटी 52 लाख रुपयांचे बिल

सूरज यादव
Thursday, 16 July 2020

रुग्णालयाने कोरोना रुग्णावर फक्त उपचार करून त्याला ठणठणीत बरं केलं असं नाही तर त्याचे बिलही माफ केले. उपचार आणि इतर खर्च मिळून एकूण बिल 1 कोटी 52 लाख इतकं झालं होतं.

दुबई - कोरोना व्हायरसने जगात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत जवळपास 6 लाखांहून अधिक लोकांचा जगात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांची सख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तर खाजगी रुग्णालयांचा खर्च सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही. गरीब लोकांना हाताला काम नसताना रुग्णालयाचा खर्च आवाक्याबाहेरचा आहे. अशा परिस्थितीत दुबईलील अनेक रुग्णालयांनी माणुसकीचा नवा धडाच जगाला दिला आहे. एका रुग्णालयाने मूळचे तेलंगणातील असलेल्या दुबईतील कोरोना रुग्णावर उपचार केले. फक्त उपचार करून त्याला ठणठणीत केलं असं नाही तर त्याचे रुग्णालयाचे बीलही माफ केले. उपचार आणि इतर खर्च मिळून एकूण बील 1 कोटी 52 लाख इतकं झालं होतं. ते माफ केलंच याशिवाय त्याला भारतात परतण्यासाठी विमानाचे तिकिट आणि अतिरिक्त दहा हजार रुपये दिले. 

तेलंगणाचे असलेल्या 42 वर्षीय ओदनला राजेश हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर 23 एप्रिलला दुबईतील रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर जवळपास 80 दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर ते ठणठणीत बरे झाल्यानंतर सुट्टी मिळाली. त्यांचे बील 7,62,555 दिऱ्हाम इतकं आलं. भारतीय चलनात हे जवळपास 1 कोटी 52 लाख रुपये इतकं होतं. एवढं मोठं बिल भागवणं राजेश यांच्यासाठी कठीण होतं. 

हे वाचा - बीएमडब्ल्यू गाडीची नेमप्लेट वाचून तुम्ही चक्रावून जाल; कोणती आहे 'ती' नेमप्लेट सविस्तर वाचाच

दुबाईतील गल्फ वर्कर्स प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष गुंदेली नरसिंहा हे राजेश यांच्या संपर्कात होते. त्यांनीच राजेश यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर बिलाचं प्रकरण दुबईत भारतीय वाणिज्य दुतावासाचे अधिकारी सुमनाथ रेड्डी यांच्यासमोर मांडण्यात आलं. त्यानंतर हरजीत सिंग यांनी दुबईतील रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून माणुसकीच्या नात्यानं राजेश यांचं बिल माफ करण्याची विनंती केली होती. 

हेही वाचा : रॅपिड अँटीजेन, अँटीबॉडी आणि आरटीपीसीआर चाचण्या तुम्हाला माहित आहे का ?

रुग्णालयानेही या विनंतीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं. माणुसकीचं अनोखं उदाहरण समोर ठेवत राजेश यांचं पूर्ण बिल रुग्णालयाने माफ केलं. तसंच राजेश यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याला भारतात परतण्यासाठी एअर इंडियाचं तिकिट दिलं. याशिवाय खर्चासाठी 10 हजार रुपयेही देण्यात आले. मंगळवारी रात्री भारतात परतलेल्या राजेश यांचे अधिकाऱ्यांनी स्वागत केले. राजेश यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dubai hospital waives indian covid treatment bill worth rs 1 crore 52 lakh