ड्युरँड लाइन : तालिबान व पाकिस्तान द्वेषाची रेषा | Taliban and Pakistan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Durand Line Taliban and Pakistan

ड्युरँड लाइन : तालिबान व पाकिस्तान द्वेषाची रेषा

तालिबान व पाकिस्तान (Taliban and Pakistan) यांच्यात ड्युरँड रेषेवरून संघर्ष पेटला आहे. पाकिस्तानकडून सीमेवर कुंपण घालण्याचे प्रयत्न होत असताना तालिबानकडून मात्र यास तीव्र विरोध केला जात आहे. अफगाणिस्तानचे सरकारने (afghanistan government) ड्युरँड रेषेला कधीच मान्यता दिलेली नाही. कारण सीमेलगतचा पश्‍तुनबहुल भाग हा अफगाणिस्तानचाच आहे, असा दावा केला जातो. त्यामुळे पाकिस्तान व अफगाणिस्तानात याच मुद्द्यावरून वेळोवेळी टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत.

ड्युरँड रेषा ही १९व्या शतकातील ब्रिटन आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धातून निर्माण झालेली सीमा असून ती उभय देशांतील ‘ग्रेट गेम’ चा एक भाग होता. या भूमीचा इंग्रजांनी अन्य देशाच्या विरोधात कारवाईसाठी वापर केला.

हेही वाचा: म्यानमार : सू की यांना आणखी चार वर्षे भोगावा लागणार तुरुंगवास

१८९३ चा ठराव

अब्दुर रेहमान हे अफगाणिस्तानचे राजे आणि ते एका अर्थाने ब्रिटिशांच्या हातचे बाहुले होते. रशियाच्या विस्ताराला लगाम घालण्यासाठी ब्रिटिशांनी कुर्रम भागात हालचाली वाढल्या. शेवटी अफगाणिस्तान आणि ब्रिटिश यांच्यात राजकीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी सीमाप्रश्‍न सोडवण्यासाठी अब्दुर रेहमान यांनी बैठक बोलावली. काबूल येथे २ ऑक्टोबर १८९३ रोजी अब्दुर रहमान व सर मॉर्टिमर ड्युरँड यांच्यात चर्चा झाली. यानुसार १२ नोव्हेंबर १८९३ च्या ठरावाप्रमाणे चित्रळ ते पेशावर आणि पेशावर ते इराण, अफगाणिस्तान व बलुचिस्तान यांचे भाग ज्या ठिकाणी मिळतात तेथपर्यंत सीमा ठरविण्यात आली. यालाच ड्युरँड रेषा म्हटले गेले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी झाल्याने ड्यूरँड रेषेबाबतचा करार लागू होत नाही, अशी भूमिका अफगाणिस्तानने घेतली. त्याचवेळी वेगळ्या पश्‍तूनिस्तानची मागणी जोर धरू लागली. अफगाणिस्तानने ड्यूरँड रेषेसह सर्व करार रद्दबातल करत असल्याचे जाहीर केले. परंतु त्यांच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठबळ मिळू शकले नाही. ब्रिटन, अमेरिका, चीनने या रेषेबबात पाकिस्तानची बाजू उचलून धरली . त्यामुळे आज या रेषेला आंतरराष्ट्रीय रेषा म्हणून मान्यता असली तरी अफगाणिस्तानने त्यास मान्यता दिलेली नाही. ड्यूरँड सीमेवरून अफगाणिस्तानकडून प्रश्‍न उपस्थित केले गेले. तालिबानच्या मते, या रेषेमुळे अफगाणिस्तानचे अनेक पश्‍तूनबहुल भाग पाकिस्तानच्या हद्दीत गेले आहेत. त्यांना परत आणणे गरजेचे आहे. तालिबानमधील बहुतांश नेते पश्‍तूनचे आहेत.

ड्युरँड रेषेवरून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा वाद पेटला आहे. या आठवड्याच्या प्रारंभीच तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिदीन याने पाकिस्तानकडून ड्यूरँड रेषेवर उभारण्यात येणाऱ्या कुंपणाला विरोध असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा: पाकमध्ये हिमवर्षावात २३ बळी

ड्युरँड रेषेला मान्यता का नाही

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा रेषा ही इंग्रजांनी आपल्या सोयीने तयार केली. १९२३ मध्ये राजे अमानुल्लापासून सध्याच्या सत्ताधिशांपर्यंत ड्युरँड रेषेबाबत हीच भूमिका राहिली आहे. तालिबानने देखील हीच भूमिका पुढे रेटली आहे. मागच्या वेळी तालिबान हे पाकिस्तानच्या पाठिंब्यावर आले होते. तेव्हा तत्कालिन नवाज शरीफ सरकारने ड्यूरँड रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा करण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. ड्युरँड रेषेची निर्मिती मुळातच चुकीच्या आधारावर झाली आहे, असे अफगाणिस्तानचे म्हणणे आहे. सर ड्युरँड यांनी पर्वत सीमा आणि ब्रिटिशांची सामरिक सोय लक्षात घेतली होती; परंतु या रेषेच्या पूर्व आणि दक्षिणपूर्व भागांत अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या पश्तुनांच्या भावना लक्षात घेतले नाही, असे अफगाणिस्तानचे म्हणणे आहे.

हेही वाचा: आयशा मलिक होणार पाकिस्तानच्या पहिल्या महिला न्यायाधीश

सप्टेंबरमध्ये ठिणगी

ऑगस्टमध्ये तालिबानची राजवट आल्यानंतर पाकिस्तानने पाठिंबा दिला आहे. परंतु दोघांच्या संबंधात पहिली ठिणगी सप्टेंबरमध्येच पाहवयास मिळाली. तालिबानच्या दहशतवाद्यांनी तोरखाम सीमेवर येणाऱ्या पाकिस्तानच्या ट्रकला अडवले आणि त्यांना पाकिस्तानचे झेंडे काढावयास लावले. या घटनेनंतर इम्रान खान सरकारने नाराजी व्यक्त केली.

कुंपण घालणाऱ्यांना पिटाळले

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान सरकारकडून ड्यूरँड रेषेवर कुंपण घालण्याचे काम सुरू केले तेव्हा तालिबानच्या दहशतवाद्यांनी ते कुंपण काढून टाकले. तालिबानने पूर्व नंगरहार येथेही सीमेवर कुंपण घालण्यास अडविल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचा प्रवक्ता इनायतुलल्ला ख्वाराज्मी यांनी सांगितले.

धोकादायक आणि द्वेष

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सुमारे २६७० किलोमीटरची आंतराष्ट्रीय सीमा ड्युरँड रेषा या नावाने ओळखली जाते. जगातील सर्वात धोकादायक सीमा रेषा म्हणून याकडे पाहिले जाते. ड्यूरँड रेषेने पश्‍तून आदिवासीबहुल क्षेत्राची फाळणी केली. त्यात गाव, जमीन तसेच कुटुबांनाही विभक्त व्हावे लागले. आपण सीमेलगत राहणाऱ्या लोकांना पत्ता विचारला तर ते म्हणतील, आम्ही द्वेषाच्या रेषेजेवळ राहतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top