पाकमध्ये हिमवर्षावात २३ बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

snowfall
पाकमध्ये हिमवर्षावात २३ बळी

पाकमध्ये हिमवर्षावात २३ बळी

लाहोर : पाकिस्तानमधील (Pakistan)प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या मुरी येथे झालेला प्रचंड हिमवर्षाव आणि त्याच सुमारास पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर केलेली गर्दी यामुळे २३ जणांचा गाड्यांमध्ये गारठून मृत्यू(23 killed) झाला. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे रस्ते बंद करावे लागल्याने हिमवर्षावात (snow fall)अडकून पडलेल्या नागरिकांना वेळेवर कोणतीही मदत मिळाली नाही.

हेही वाचा: खाकी वर्दीवर रक्ताचा डाग; मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी बॉयला उडवलं

मुरी हे ठिकाण पंजाब प्रांतातील रावळपिंडीमध्ये आहे. या ठिकाणी चांगला हिमवर्षाव सुरु झाल्याने नागरिकांनी सुटीचा दिवस साधून प्रचंड प्रमाणात गर्दी केली. या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, यामुळे गावाकडे जाणारे रस्ते प्रशासनाला बंद करावे लागले. त्याचवेळी या ठिकाणी विक्रमी हिमवर्षाव झाल्याने पर्यटक त्यांच्या गाड्यांमध्येच अडकून पडले. त्यांच्या गाड्यांवर बर्फाचे थर साचले. सर्व रस्ते बंद झाल्याने आणि रस्ते हिमाच्छादित झाल्याने प्रशासनाला या अडकून पडलेल्या पर्यटकांना मदत करणेही अशक्य झाले होते. यामुळे गाड्यांमध्येच गारठून आणि गुदमरून काल (ता. ८) रात्री १० बालकांसह २२ जणांचा मृत्यू झाला. आज एका गाडीतील अल्पवयीन मुलीला वेळेवर रुग्णालयात न नेता आल्याने तिचाही मृत्यू झाल्याने या घटनेतील मृतांची संख्या २३ झाली आहे.

हेही वाचा: अखेर लसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवला जाणार PM मोदींचा फोटो

प्रशासनावर टीका

मुरी भागात प्रचंड हिमवर्षाव होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला असतानाही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मंडळाने आणि रावळपिंडी प्रशासनाने कोणतीही पूर्वतयारी केली नव्हती, असा आरोप येथील माध्यमांनी केला आहे. यासंदर्भात साधी बैठकही घेतली गेली नव्हती, असा दावा ‘डॉन’ या वृत्तपत्राने केला आहे. मुरीमध्ये पाच जानेवारीला ६.५ इंच, सहा जानेवारीला ८.५ इंच, तर सात जानेवारीला १६.५ इंच इतका प्रचंड हिमवर्षाव झाला.(Pakistan news)

हेही वाचा: ‘... तरच मुस्लिमाचे घर सुरक्षित राहील’

गाड्या सोडून लोक गेले

मुरी भागात प्रचंड हिमवर्षाव झाल्याने झालेली ही दुर्घटना नैसर्गिक आपत्ती असल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी म्हटले आहे. प्रचंड हिमवर्षाव सुरु झाल्याने अनेक लोकांनी गाड्या रस्त्यांच्या मध्येच सोडून देत हॉटेल आणि इतर ठिकाणी आश्रय घेतल्याने रस्त्यांवरील वाहतुकीला प्रचंड अडथळे निर्माण होऊन ती अखेरीस ठप्प झाली, अशी माहिती त्यांनी दिली. या हिमवर्षावात अडकलेल्या पाचशे कुटुंबीयांची आतापर्यंत सुटका केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pakistanglobal news
loading image
go to top