पाकिस्तानमध्ये निवडणूक काळातील हल्ले सुरूच 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जुलै 2018

पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाच्या उमेदवारावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले, तर त्यांचा वाहनचालक ठार झाला. सार्वत्रिक निवडणूक तीन दिवसांवर आली असतानाही प्रचार सभांवर दहशतवादी हल्ला होण्याचे प्रकार थोपविण्यात पाकिस्तान सरकारला अपयश आले असल्याचेच यामुळे स्पष्ट झाले आहे. 

पेशावर : पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाच्या उमेदवारावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले, तर त्यांचा वाहनचालक ठार झाला. सार्वत्रिक निवडणूक तीन दिवसांवर आली असतानाही प्रचार सभांवर दहशतवादी हल्ला होण्याचे प्रकार थोपविण्यात पाकिस्तान सरकारला अपयश आले असल्याचेच यामुळे स्पष्ट झाले आहे. 

अस्थिर पाकिस्तानमधील सर्वाधिक अशांत भाग असलेल्या खैबर पख्तुनख्वा भागातून इक्रमुल्ला गंडापूर हे प्रचारसभेसाठी वाहनातून जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बॉंबरद्वारे हल्ला केला. या वेळी झालेल्या स्फोटात त्यांचा वाहनचालक ठार झाला, तर गंडापूर हे जबर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या एका घटनेत जमायत उलेमा इस्लाम फझल या पक्षाचे नेते अक्रम खान दुर्रानी हे वाझिरीस्तान भागात प्रचार करत असतानाच त्यांच्या वाहनावरही आज अज्ञात हल्लेखोरांनी तुफान गोळीबार केला. या हल्ल्यात दुर्रानी यांना इजा झाली नाही. दुर्रानी यांच्यावर गेल्या आठवड्यातही हल्ला झाला होता. 

प्रचार अंतिम टप्प्यात 
पाकिस्तानमध्ये 25 जुलैला सार्वत्रिक निवडणूक होत असून, येथील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) आणि पाकिस्तान तेहरीके इन्साफ या प्रमुख पक्षांसह इतर सर्व छोटे पक्ष प्रचारसभा घेण्यावर भर देत आहेत. या अखेरच्या दिवसांमध्ये मोठ्या शहरांमध्ये सर्वांत वरिष्ठ नेत्यांच्या सभांचा धडाका पक्षांनी लावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election time attacks are going on in Pakistan