कोरोनाचे उच्चाटन वर्षअखेरपर्यंत अशक्य; ‘डब्ल्यूएचओ’च्या अधिकाऱ्यांचे मत

पीटीआय
Wednesday, 3 March 2021

कोरोनाव्हायरसच्या धोका अद्याप कायम असून संपूर्ण जगाला हादरवणारी ही साथ या वर्षअखेरपर्यंत तरी संपुष्टात येणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. मात्र यावर सध्या उपलब्ध झालेल्या प्रभावी लशींमुळे कोरोना रुग्णांचे आणि याच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होईल, अशी आशा संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १) व्यक्त केली.

जीनिव्हा - कोरोनाव्हायरसच्या धोका अद्याप कायम असून संपूर्ण जगाला हादरवणारी ही साथ या वर्षअखेरपर्यंत तरी संपुष्टात येणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. मात्र यावर सध्या उपलब्ध झालेल्या प्रभावी लशींमुळे कोरोना रुग्णांचे आणि याच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होईल, अशी आशा संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १) व्यक्त केली. 

या वर्षात कोरोनाचे उच्चाटन होईल, असा विचार करणे उतावळेपणा आणि अवास्तव ठरेल, असे मत ‘डब्ल्यूएचओ’च्या आपत्कालीन कार्यक्रमाचे संचालक डॉ. मायकेल रायन यांनी व्यक्त केले. कोरोनाचे संक्रमण कमी करणे या एकाच गोष्टीवर जगाला सर्व लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. जर आपण यशस्वी ठरलो तर या वर्षांत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण तसेच मृत्यूदर आणि अन्य संकटे कमी करणे शक्य होणार आहे, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या वेगाने कोरोनाचा प्रसार झाला आहे, तो रोखण्यासाठी सध्या विकसित झालेल्या अधिकृत लशी प्रभावी ठरतील, असा विश्‍वास ‘डब्ल्यूएचओ’ला वाटत आहे. रायन म्हणाले की, लशींमुळे रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी होण्याबरोबरच त्याचा वेगही आणि धोका कमी झाला तर ही साथ नियंत्रणात आणण्याच्या दिशेने जाणे शक्य होईल. मात्र अति उत्साहाबाबत इशारा देत अशा महासाथीबद्दल कोणतीही हमी देता येत नाही. सध्या तरी ही साथ खूप नियंत्रणात आहे, असे त्यांनी सांगितले.

जागतिक व्यापार संघटनेकडूनही भारतावर कौतुकाचा वर्षाव; अध्यक्षांनी व्यक्त केला आदर

श्रीमंत देशांबद्दल नाराजी  
दरम्यान, विकसनशील देशांतील जोखमीच्या श्रेणीतील आरोग्य कार्यकर्त्यांच्या आधी काही श्रीमंत देशांतील युवा आणि सुदृढ प्रौढांना लस दिली, याबद्दल ‘डब्ल्यूएचओ’चे सरसंचालक टेड्रॉस अधनोम घेब्रेयेसुस यांनी खंत व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने ‘कोव्हॅक्स’चे लसीकरण घाना आणि आयव्हरी कॉस्ट येथे गेल्या आठवड्यापासून सुरू झाले, असे सांगताना ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडाने त्यांच्या नागरिकांना लस देण्यास दिल्याच्या तीन महिन्यांनंतर तेथे लस देण्यास सुरुवात झाली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सर्वांत असुरक्षित गटातील नागरिकांचा बचाव करणे ज्या देशांना शक्य होत नाही, त्यांना लस न पुरविता स्वतःच्या देशातील युवा आणि सुदृढ नागरिकांना लस देणाऱ्या देशांवर टीका करणे ‘डब्ल्यूएचओ’ने बंद करावे. प्रत्येक देशाने काय करावे, हे आपण सांगू शकत नाही.
- डॉ. ब्रुस एनिलवॉर्ड, वरिष्ठ सल्लागार, ‘डब्ल्यूएचओ’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elimination of Corona impossible by the end of the year WHO officials say