जागतिक व्यापार संघटनेकडूनही भारतावर कौतुकाचा वर्षाव; अध्यक्षांनी व्यक्त केला आदर

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 2 March 2021

कोरोनाच्या काळात भारताने केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेनं प्रचंड कौतुक केलं होतं.

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात भारताने केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेनं प्रचंड कौतुक केलं होतं. इतक्या मोठ्या लोकसंख्येचा देश असूनही इटली, ब्राझील, अमेरिका या देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यू दर कमी होता. याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली होती. त्यानंतर आता भारताच्या व्यापारविषयक धोरणाचंही जागतिक पातळीवर कौतुक होत आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुख अन्गोझी ओकांडो-ऐवेला यांनी भारताचे कौतुक केले आहे. भारताविषयी मला प्रचंड आदर असल्याचं अन्गोझी यांनी म्हटलंय. कोरोना लस उत्पादनासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांचीही अन्गोझी यांनी प्रशंसा केली आहे. जगाला सध्या गरजेचे असलेले कोरोना लशीचे डोस आणि उत्पादन यातील तफावत चिंतेचा विषय असल्याचे अन्गोझी यांनी सांगितले तसेच, अनेक देशांमध्ये अजूनही लस पोहोचली नसल्याने त्याचे गांभीर्य अधिक असल्याचे त्या म्हणाल्या. भारताचे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी आपण सतत संपर्कात असून, त्यांच्याबद्दल प्रचंड आदर असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अन्गोझी ओकांडो-ऐवेला या जागतिक व्यापार संघटनेची धुरा सांभाळणाऱ्या पहिला माहिला आहेत. तसेच, जागतिक पातळीवरच्या इतक्या मोठ्या संस्थेचे काम पाहणाऱ्या त्या पहिलाय अफ्रिकन व्यक्ती आहेत.

कोरोनाचे मोठे आव्हान

जागतिक व्यापार संघटनेतमध्ये वेगवेगळ्या मुद्दयांवरून मतभेद आहेत. अनेक देश एकामेकांच्या धोरणांवर आक्षेप नोंदवत आहेत. भारतात शेती उत्पादनांना देण्यात येणाऱ्या अनुदानालाही आक्षेप घेतला जात आहे. भारतातील अनुदानामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय उत्पादनाचे दर कमी राहतात आणि इतर देशांच्या मालाचेही आर्थिक नुकसान होते, असा मुद्दा उपस्थित केला जातो त्यावर अन्गोझी यांनी भाष्य केले आहे. सध्या संपूर्ण जगासमोर कोरोना महामारीचे आव्हान आहे. त्यामुळे त्या आव्हानाला तोंड देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जागतिक व्यापार संघटना कोणते योगदान देऊ शकते यासाठी आम्ही प्राधान्य देत आहोत. 

विराटची 100 मिलीयन क्लबमध्ये एन्ट्री; पहा कोणत्या फोटोंमुळे केला विक्रम

कोरोना लशीला मागणी

कोरोनाच्या लस उत्पादनात भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांना अन्गोझी यांनी दाद दिली. भारतात सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या माध्यमातून सुरू असलेले प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या घडीला जगात 35 कोटी कोरोना लस तयार होत आहेत. पण, जगाला सध्या 100 कोटी कोरोना डोस गरजेचे आहेत. ही तफावत भरून काढण्याचे सगळ्यांत मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. जगाच्या पाठीवर असेही अनेक देश आहेत. जिथं एकाही व्यक्तीला अजून कोरोनाची लस देण्यात आलेली नाही, असे करून चालणार नाही. याकडे खूप गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. 

भारतीय विमानाचं पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग

भारतातील साठेबाजी

मासेमारीसाठी देण्यात येत असलेल्या अनुदानावर जागतिक व्यापार संघटनेमध्ये चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे यावर 20 वर्षांपासून वाद सुरू आहे हा वाद आता निकाली काढला पाहिजे, असे मत अन्गोझी यांनी मांडले आहे. एखाद्या मुद्द्यावर तोडगा निघण्यासाठी 20 वर्षे खूप आहेत, असंही अन्गोझी म्हणाल्या. दरम्यान, भारतासारख्या विकसनशील देशात सार्वजनिक साठेबाजीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आम्ही त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. भारताने याविषयावर काही मुद्दे मांडले आहेत. संघटनेतील इतर सदस्य त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेला तयार आहेत, असंही अन्गोझी यांनी स्पष्ट केलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Trade Organization WTO chief Ngozi OkonjoIweala praises india pm narendra modi