विदेशी पैसा घेण्यावरून ट्रम्प यांच्याविरुद्ध दावा

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःच्या कंपन्यांना परदेशातील सरकारांकडून पैसे स्वीकारण्याची मुभा देत असल्यावरून वादात अडकण्याची शक्यता आहे. व्हाईट हाऊसमधील आचारसंहितेशी निगडीत वकिलांचा एक गट याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दावा दाखल करणार आहे. 

अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयातील वकील दीपक गुप्ता हे या प्रकरणावर काम करीत आहेत. गुप्ता यांनी सांगितले की, "अमेरिकन राज्यघटनेच्या आर्थिक लाभासंबंधीच्या कलमानुसार ट्रम्प यांच्या उद्योगांना मिळणाऱ्या विदेशी देयकांना (पेमेंट) परवानगी नाही, असा आरोप या दाव्यात करण्यात येणार आहे. ट्रम्प यांना अशी पेमेंट्स घेण्यास मज्जाव करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात येईल."

मॅनहॅटन न्यायालयात हा दावा दाखल करण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. ट्रम्प यांच्याविरोधात उदारमतवादी वकिलांच्या गटांकडून खटले दाखल करण्याची लाट येण्याची शक्यता असून, त्यापैकीच हा एक दावा आहे, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. 

ट्रम्प ऑर्गनायझेशनचे कार्यकारी उपाध्यक्ष व ट्रम्प यांचे पुत्र एरिक म्हणाले, "कोणतीही कायदेशीर अडचण टाळण्यासाठी आम्ही आवश्यकतेपेक्षा अधिक काळजी घेतली आहे. ट्रम्प हॉटेलांमध्ये परदेशी सरकारी पाहुण्यांकडून मिळणारा नफा अमेरिकेच्या तिजोरीत देणगी म्हणून जमा करण्याला आम्ही सहमती दर्शवली आहे."
 
Web Title: Ethics lawyers to sue Donald Trump over foreign payments