Nobel Prize 2019 : सीमावादाची भिंत तोडणाऱ्या शांतिदूताचा सन्मान!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

अबीय अहमद यांनी एकीकरण, सामाजिक सौहार्द आणि न्याय आदी घटकांना प्रोत्साहन द्यायला सुरवात केली असली तरीसुद्धा आणखी बऱ्याच आव्हानांना त्यांना तोंड द्यावे लागेल. 

स्टॉकहोम : आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणि सहकार्य प्रस्थापित व्हावे म्हणून केलेले प्रयत्न आणि शेजारील इरिट्रिया या देशासोबतचा मागील वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला सीमावाद निकाली काढणारे इथिओपियाचे पंतप्रधान अबीय अहमद अली यांना यंदाचा शांततेचा नोबेल सन्मान जाहीर झाला आहे. नोबेल पुरस्कार समितीने शुक्रवारी (ता.11) ही घोषणा केली. 

इथिओपियाच्या एकीकरणाबरोबरच या भागामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रयत्न करणारे आणि पूर्व आणि ईशान्य आफ्रिकी प्रदेशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अविरत लढा देणाऱ्या सर्वच घटकांचा हा गौरव असल्याचे पुरस्कार समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. सीमाप्रश्‍नाचा वाद पंतप्रधान अबीय यांच्या हाताबाहेर गेल्यानंतर इरिट्रियाचे अध्यक्ष अफवेरकी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला, पुढे या दोघांनी उभय देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रयत्नही केले, असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

इथिओपियामध्ये भिन्न भाषा आणि संस्कृतीच्या लोकांचे वास्तव्य आहे, वांशिक स्पर्धाही या देशाला नवीन नाहीत. येथील वांशिक संघर्षामुळे तीस लाखांपेक्षाही अधिक लोकांना देशांतर्गत स्थलांतर करावे लागले, तर अन्य लाखो लोकांना शेजारील देशांमध्ये आश्रय घ्यावा लागला, असे आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचे मत आहे. अबीय अहमद यांनी एकीकरण, सामाजिक सौहार्द आणि न्याय आदी घटकांना प्रोत्साहन द्यायला सुरवात केली असली तरीसुद्धा आणखी बऱ्याच आव्हानांना त्यांना तोंड द्यावे लागेल. 

ग्रेटा थनबर्गच्या नावाची चर्चा 
इथिओपिया हा आफ्रिका खंडातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असून, पूर्व आफ्रिकी भागांत या देशाची अर्थव्यवस्था सर्वांत मोठी आहे.

दरम्यान, यंदा शांततेच्या नोबेल सन्मानासाठी 301 जणांची नामांकने आली होती, यातील 223 या व्यक्ती होत्या, तर 78 संघटनांची नावेदेखील पुरस्कारासाठी चर्चेत होती. जागतिक तापमानवाढीविरोधात लढा देणाऱ्या ग्रेटा थनबर्ग यांनाही हा सन्मान मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आता 'एअर इंडिया वन'

- मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला पुन्हा अपघात; मोठा अनर्थ टळला

- Happy Birthday Big B : महानायकाच्या 77 व्या वाढदिवशी वाचा त्यांचे गाजलेले 77 डायलॉग्ज!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ethiopian PM Abiy Ahmed Ali wins Nobel Peace Prize 2019