काबूलमध्ये पुन्हा स्फोट; स्थानिक माध्यमांची माहिती

काबूलमध्ये पुन्हा स्फोट; स्थानिक माध्यमांची माहिती

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याचे वृत्त आहे, याबाबतची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे आयसिसचाच हात असल्याचा संशय आहे. सध्या सुरु असणाऱ्या सुटकेच्या मोहिमेदरम्यान अमेरिकन लोकांना लक्ष्य करण्यासाठी हा रॉकेट हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. याला आता अमेरिकेने प्रत्युत्तर दिलंय. काबूलमध्ये इसिस-केच्या संशयित दहशतवाद्यांना लक्ष्य करत अमेरिकेने लष्करी हल्ला केलाय, असे दोन अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने रॉयटर्सने सांगितलंय.

हा रॉकेट हल्ला काबूल एअरपोर्टजवळच झाला आहे. एअरपोर्ट जवळील एका घरावर हा रॉकेट हल्ला झाला आहे. यामध्ये एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अमेरिकेने याआधीच दुसऱ्या स्फोटाची शक्यता व्यक्त केली होती. गेल्या २६ ऑगस्टला पहिला स्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटामागे आयसिस खोरासन होते.

काबूल विमानतळावर एक ते दोन दिवसांत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला शक्य असल्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे. काबूलमधील अमेरिकी नागरिकांनी विमानतळ परिसरात थांबून न राहता सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा, असा सल्ला सरकारने दिला आहे. काबूल विमानतळावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या नागरिकांना माघारी नेण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. ही मोहिम आता अंतिम टप्प्यात आली असताना विमानतळावर आणखी एक हल्ला होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचे अमेरिकेच्या गृह विभागाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना बायडेन म्हणाले की, ‘विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. येत्या एक ते दोन दिवसांतच हा हल्ला होणार असल्याचे आमच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. अमेरिकी नागरिकांच्या संरक्षणासाठी योग्य त्या हालचाली करण्याच्या सूचना मी त्यांना दिल्या आहेत. ’’ काबूल विमानतळावर झालेल्या हल्ल्यात १७० अफगाणी नागरिकांबरोबरच १३ अमेरिकी सैनिकांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यास जबाबदार असणाऱ्यांवर हल्ले सुरुच ठेवणार असल्याचेही बायडेन यांनी स्पष्ट केले. अमेरिकेला हानी पोहचविणाऱ्यांना प्रायश्‍चित्त भोगावेच लागेल आणि त्यांच्यावर प्रतिहल्ले करू, असा इशारा त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com