युरोपात हाड गोठवणारी थंडी

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

लंडन: यंदा कडाक्‍याच्या थंडीने तापमानाचा नीचांक गाठला आहे. भारतातील सिमला असो की युरोपातील शहरे असो, थंडीने चांगलेच गारठून गेले आहेत. या थंडीच्या लाटेमुळे युरोपात गेल्या दोन दिवसांत वीसहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. दुसरीकडे ग्रीक, दक्षिण इटली या उबदार तापमानाच्या देशांनाही हिमवृष्टीचा सामना करावा लागला आहे. युरोपातील निर्वासितांचे थंडीमुळे हाल होत असून स्थानिक प्रशासनाच्या वतीने तात्पुरती निवाऱ्याची सोय करून दिली जात आहे. तसेच बहुतांशी शहरातील विमानसेवा विस्कळित झाली असून या आठवड्यात विमानसेवा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.

पोलंडमध्ये हाडे गोठवणाऱ्या या थंडीने किमान दहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याठिकाणी उणे 14 तापमानाची नोंद झाली आहे. चेक प्रजासत्ताकमध्ये कमालीची थंडी पडली आहे. ग्रीसमध्ये आलेल्या स्थलांतरितांना या कडाक्‍याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात ग्रीसमध्ये आलेल्या एका अफगाण निर्वासिताचा अतिथंडीमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. स्थलांतरितांना राहण्यासाठी तात्पुरती निवासाची सोय केली जात आहे. युरोपातील काही शहरांत विमानतळ बंद करण्यात आले आहे.

इटलीमध्ये गेल्या दोन दिवसांत थंडीचे सात बळी गेले आहेत. त्यापैकी पाच बेघरांचा समावेश असून त्यात दोन पोलिस नागरिकांचा समावेश आहे. मध्य इटलीत मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू आहे. त्यामुळे बारी, ब्रिंडसी आणि सिसीली विमानतळ बंद करण्यात आले होते. रशियाच्या काही भागांत रात्रीचे तापमान उणे 30 अंशांपर्यंत घसरले आहे. सेंट पीटर्सबर्ग येथे उणे 24 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. रशियात यंदाचा ख्रिसमस हा शतकातील सर्वांत थंड असल्याचे आढळून आले आहे. बल्गेरियात थंडीमुळे दोन इराकी स्थलांतरित नागरिकांचा मृत्यू झाला. तुर्कस्थानलगत असलेल्या जंगलात गोठलेल्या अवस्थेत या नागरिकांचे मृतदेह गावकऱ्यांना आढळून आले. तुर्कस्थानमध्ये थंडीच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. खराब हवामानामुळे उड्डाणे रद्द केल्याने इस्तंबूल विमानतळावर उड्डाणाअभावी विमाने उभी आहेत. ग्रीसच्या ऍथेन्समध्ये शून्य ते उणे 15 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. युरोपात सर्वांत नीचांकी तापमान दोन दिवसांपूर्वी स्विझर्लंडच्या ला ब्रेवाइन येथे उणे 29.9 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. यापूर्वी तीन दशकांपूर्वी 12 जानेवारी 1987 रोजी स्विझर्लंडमध्ये उणे 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Web Title: Extreme cold in Europe