रेक्‍स टिलेर्सन हेच अमेरिकेचे नवे परराष्ट्र मंत्री

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

रशियाशी गेली दोन दशके व्यावसायिक संबंध असलेल्या टिलेर्सन यांना रशियाकडून 2013 मध्ये "ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप' पुरस्काराने गौरविण्यातही आले होते. रशियाने क्रिमिया हस्तगत केल्यानंतर रशियावर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांस टेलर्सन यांनी स्पष्ट विरोध दर्शविला होता. या पार्श्‍वभूमीवर, त्यांची निवड अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जात आहे...

वॉशिंग्टन- अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्‍झॉन मोबिल या प्रभावी बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेक्‍स डब्ल्यू टिलेर्सन यांच्याकडे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदाची धुरा सोपविण्यासंदर्भातील औपचारिक घोषणा केली आहे. टिलेर्सन हेच अमेरिकेचे नवे परराष्ट्र मंत्री असतील, अशा आशयाचे संकेत ट्रम्प यांनी याआधी दिले होते.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदासाठी टिलेर्न यांच्यासह ज्येष्ठ रिपब्लिकन नेते मिट रॉमनी, ट्रम्प यांचे निष्ठावंत सहकारी रुडॉल्फ डब्ल्यू जियुलिआनी यांच्यासह अन्य काही प्रभावी नेत्यांची नावेदेखील चर्चेत होती. रॉमनी यांनी ट्रम्प यांच्यावर कठोर टीका केली असली; तरी ट्रम्प त्यांना "माफ' करुन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदाची संवेदनशील जबाबदारी त्यांच्याकडे सोपवितील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत ट्रम्प यांनी टिलेर्सन यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र टिलेर्सन यांच्या नियुक्तीचे येथील सिनेटमध्ये मोठे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे.

टिलेर्सन यांच्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी असलेल्या उत्तम मैत्रीपूर्ण संबंधांसंदर्भात अमेरिकेतील अनेक राजकीय नेत्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. रशियाशी गेली दोन दशके व्यावसायिक संबंध असलेल्या टिलेर्सन यांना रशियाकडून 2013 मध्ये "ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप' पुरस्काराने गौरविण्यातही आले होते. टिलेर्सन यांच्या एक्‍झॉन मोबिल कंपनीच्या रशियाशी असलेल्या व्यावसायिक संबंधांची या पार्श्‍वभूमीवर कठोर तपासणी होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे. रशियन तेल क्षेत्रात उघड आर्थिक हितसंबंध असलेल्या टिलेर्सन यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्यास अमेरिकन परराष्ट्र धोरणावर त्याचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टिलेर्सन (वय 64) यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संवेदनशील चर्चांचा मोठा अनुभव आहे. रशियाने क्रिमिया हस्तगत केल्यानंतर रशियावर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांस टेलर्सन यांनी स्पष्ट विरोध दर्शविला होता. या पार्श्‍वभूमीवर, त्यांची निवड अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जात आहे.

Web Title: Exxon CEO & Putin's friend Tillerson USA's new secretary of state