'ती' मुले अंतिम सामना पहायला जाणार नाहीत ...

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जुलै 2018

'फिफाच्या कार्यकारी समितीला फुटबॉल विश्वकरंडकात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी आहे. या मुलांना आमंत्रित करण्यासाठी फिफाच्या एखाद्या नंतरच्या कार्यक्रमात आनंद साजरा करण्यासाठी आम्ही या मुलांना निमंत्रित करू,' असे फुटबॉल कार्यकारी समितीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

थायलंड : थायलंडच्या उत्तरेकडील थाम लुआंग नांग या गुहेत अडकलेली 12 मुले व त्यांचे एक प्रशिक्षक यांना काल (ता. 10) थायलंडची रेस्क्यू टीम व भारतातील किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) अभियंता प्रसाद कुलकर्णी यांच्या मदतीने गुहेबाहेर काढण्यात आले. गेले 18 दिवस चालू असलेले हे बचावकार्य हे अखेरीस काल संपले. 

या मुलांना व त्यांच्या प्रशिक्षकांना सध्या चालू असलेल्या फुटबॉल विश्वकरंडकाच्या मॉस्को येथे होणाऱ्या अंतिम सामन्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मागच्या आठवड्यात फुटबॉल कार्यकारी समितीने या गुहेत अडकलेल्या फुटबॉलपटूंना अंतिम सामन्यासाठी पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. पण तब्बल 18 दिवस अन्न-पाण्याशिवाय राहिल्याने या मुलांना अशक्तपणा आला आहे, त्यामुळे फिफाने कळविले आहे की, अशक्तपणामुळे व काही वैद्यकीय कारणांमुळे ही मुले अंतिम सामन्याला उपस्थित राहू शकत नाहीत. अशक्तपणामुळे ही मुले मॉस्कोपर्यंतचा प्रवास करू शकणार नाहीत. 

'फिफाच्या कार्यकारी समितीला फुटबॉल विश्वकरंडकात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी आहे. या मुलांना आमंत्रित करण्यासाठी फिफाच्या एखाद्या नंतरच्या कार्यक्रमात आनंद साजरा करण्यासाठी आम्ही या मुलांना निमंत्रित करू,' असे फुटबॉल कार्यकारी समितीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. तसेच थाई रेस्क्यू टीममधील एका जवानाला बचावकार्यादरम्यान जीव गमवावा लागला त्यांच्याप्रती फिफाने श्रद्धांजली व्यक्त केली आहे. 

23 जून रोजी बारा मुले व त्यांचे 25 वर्षीय प्रशिक्षक फुटबॉल खेळण्यासाठी या भागात गेले असता अचानक पाऊस सुरू झाला व आडोश्यासाठी ते या गुहेत गेले. पण मुसळधार पावसामुळे या गुहेच्या सर्व वाटा बंद झाल्या आणि मुले व प्रशिक्षक गुहेत अडकले. पण थायलंडची रेस्क्यू टीम व भारतातील किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) अभियंता प्रसाद कुलकर्णी यांच्या सहाय्याने या सर्वांना काल (ता. 10) 18 दिवसांनी सुखरूप गुहेबाहेर काढण्यात आले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIFA Says Rescued Thai Boys Wont Attend World Cup Final match in Moscow