अखेर नेपाळ झुकला; भारतीय न्यूज चॅनेलवरील बंदी हटवली

कार्तिक पुजारी
सोमवार, 13 जुलै 2020

ओली सरकारच्या चिथावणीने नेपाळच्या केबल पुरवढादारांनी देशात भारतीय वृत्त वाहिन्या न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नेपाळने भारतीय वृत्त वाहिन्यांच्या प्रसारणावरील निर्बंध उठवले आहेत.

काटमांडू- ओली सरकारच्या चिथावणीने नेपाळच्या केबल पुरवढादारांनी देशात भारतीय वृत्त वाहिन्या न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नेपाळने भारतीय वृत्त वाहिन्यांच्या प्रसारणावरील निर्बंध उठवले आहेत. मॅक्स डिजिटल टेलिव्हिजनचे उपाध्यक्ष धुर्बा शर्मा यांनी केबल पुरवढादारांसोबत झालेल्या बैठकीत हे प्रतिबंध हटवण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही आक्षेपार्ह कार्यक्रम दाखवणाऱ्या वाहिन्यांवरील प्रतिबंध सुरुच राहणार आहे.

नोटबंदीमुळं झालं नाही ते कोरोनामुळे शक्य
केपी ओली शर्मा आणि चिनी राजदूत यांच्यावरील कव्हरेजमुळे नाराज झाल्याने भारतीय वाहिन्या न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही वृत्त वाहिन्या अजूनही चुकीचा कार्यक्रम दाखवत आहेत, त्यामुळे अशा वाहिन्या बंदच ठेवण्यात येतील, असं धुर्बा म्हणाले आहेत. माई रिपब्लिकाच्या वृत्तानुसार, नेपाळमधील अनेक नागरिकांनी भारतीय वृत्त वाहिन्या दाखवण्याचा आग्रह केबल पुरवढादारांकडे केला होता. तसेच अनेक नागरिकांनी याआधीच भारतीय वृत्त वाहिन्यांचे सदस्यत्व घेतलं होतं. त्यामुळे ग्राहकांचा वाढत्या दबावामुळे केबल पुरवढादारांनी आपला जुना निर्णय बदलला आहे.

ज्या भारतीय वृत्त वाहिन्यांना नेपाळमध्ये प्रसारणाला परवानगी देण्यात आली आहे, त्यांनी पुन्हा जर आक्षेपार्ह कार्यक्रम दाखवला तर त्यांच्यावर पुन्हा बंदी आणण्यात येईल, असंही धुर्बा म्हणाले. यापूर्वी नेपाळ सीमा वादानंतर कारवाई म्हणून भारतीय वृत्त वाहिन्या दाखवण्यास बंदी आणण्यात आली होती. नेपाळने यासंदर्भात कोणताही आधिकारिक आदेश दिला नव्हता. मात्र, केबल पुरवढादार संघटनांनी एकत्र येत वाहिन्या न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. बंदी घालण्यात आलेल्या वाहिन्यांमधून दूरदर्शनला वगळण्यात आलं होतं.

काँग्रेसचा राजस्थानचा गड वाचवायला महाराष्ट्र धावला?
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि नेपाळमधील संबंध ताणले गेले आहेत. नेपाळने आपल्या देशाचा नवा नकाशा संसदेत मंजूर करुन घेतला आहे. यात भारताचे लिपूलेख, कालापाणी आणि लिंपियाधुरा हे भारतीय भूभाग आपल्या नकाशात दाखवले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वाद निर्माण झाला आहे. भारताने नेपाळच्या या नव्या नकाशाला विरोध केला आहे. त्यामुळे चीनच्या मर्जीतले नेपाळी पंतप्रधान केपी. ओली यांनी भारतावर आगपाखड केली आहे. तसेच भारत आपल्याला सत्तेतून घालवण्याठी प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, ओली यांच्या भारताबाबतच्या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षातूनच त्यांना विरोध होत आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष प्रचंड यांनी ओली यांच्यावर अविश्वास दाखवला आहे. तसेच त्यांनी पदावरुन पायउतार व्हावं यासाठी त्यांच्यावर दबाव आणला आहे. त्यामुळे ओली यांचे पंतप्रधानपद धोक्यात आले आहे. मात्र, चीनकडून ओली यांना पाठिंबा मिळत असल्याने त्यांचे भविष्य लांबणीवर पडत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Nepal bowed Ban on Indian news channels lifted