कोरोना विषाणूचा उगम आणि प्रसार कसा झाला,याचा शोध घ्या

पीटीआय
मंगळवार, 19 मे 2020

तैवानचा सहभाग नाही
तैपेई : जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होणार नसल्याचे तैवानने आज जाहीर केले. त्यांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता होती. परिषदेत सहभाग घेणार नसलो तरी जगभरात वैद्यकीय साधनांचा पुरवठा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तैवानला आपलाच एक भाग मानणाऱ्या चीनचा तैवानच्या स्वतंत्र अस्तित्वालाच विरोध आहे. चीनच्या दुटप्पीपणावर टीका करताना तैवानने आरोग्य संघटनेच्या पुढील बैठकीत त्यांच्या सहभागाबाबत चर्चा करण्याचा मित्र देशांचा सल्ला मान्य केला आहे.

जीनिव्हा - कोरोना संकटविरोधात जागतिक पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांचे आणि यंत्रणेचे निष्पक्ष, स्वतंत्र आणि सर्वसमावेशक मूल्यमापन करण्याची आवश्यकता भारतासह ६० हून अधिक देशांनी व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य परिषदेच्या (डब्लूएचए) ७३ व्या सत्रात याबाबतचा मसुदा सादर झाला असून यामध्ये कोरोना विषाणूचा उगम आणि प्रसार कसा झाला,याचा शोध घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्लूएचओ) भाग नसलेल्या ''डब्लूएचए''चे हे सत्र आज आणि उद्या जीनिव्हा येथे होत आहे. कोरोनाचा उगम कोठे झाला, यावरून अमेरिका आणि चीनमध्ये जोरदार वाद सुरू असल्याने त्याचे पडसाद या परिषदेत पडणार आहेत. या परिषदेत चर्चा करण्याच्या विषयांच्या मसुद्याला भारताने पाठिंबा दिला आहे. युरोपीय महासंघाने हा मसुदा तयार केला आहे. कोरोनाविरोधात राबविण्यात येत असलेल्या यंत्रणेचा आणि उपायांचा पद्धतशीर आणि तटस्थपणे आढावा घेण्याचा आग्रह या मसुद्यात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रगीत, वादग्रस्त विधेयक अन् चीनच्या संसदेतील दादागिरी!

पाठिंबा देणारे प्रमुख देश
भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बेलारूस, भूतान, ब्राझील, कॅनडा, चिली, कोलंबिया, जिबुती, इक्वेडोर, एल साल्वाडोर, ग्वाटेमाला, इंडोनेशिया, आइसलँड, जपान, जॉर्डन, कझाखस्तान, मलेशिया, मालदीव, मेक्सिको, न्यूझीलंड, नॉर्वे, पेरू, कतार, द.कोरिया, रशिया, सौदी अरेबिया, तुर्कस्तान, युक्रेन, ब्रिटन.अमेरिकेचे नाव यादीत नसले तरी त्यांचा पाठींबा गृहीत.

सर्वसमावेशक चौकशीस चीन तयार
कोरोनाच्या उगमाबाबत चीनकडे सगळे देश बोट दाखवत असताना आणि स्वतंत्र चौकशीची मागणी करत असताना ’सर्वसमावेशक’ चौकशीस चीन तयार असल्याचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज जागतिक आरोग्य परिषदेत सांगितले. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना जिनपिंग म्हणाले की, विषाणूच्या प्रसाराबाबत आणि उपाययोजनांबाबत सर्वसमावेशक आढावा आवश्‍यक आहे. याबाबतचा तपास निष्पक्ष पद्धतीने आणि पारदर्शकपणे व्हावा. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना दोन अब्ज डॉलरची मदतही जिनपिंग यांनी यावेळी जाहीर केली. विषाणूच्या उगमाबाबत तपास करताना चीनला आधीच दोषी ठरवून त्यादिशेने चौकशी करणे, चीनला अजिबात मान्य नसल्याचे चीनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय आहे मसुद्यात...

  • कोरोनावरील उपाय योजनांचे मूल्यमापन व्हावे
  • कोरोनाचा उगम कोठे झाला त्याचा शोध घ्यावा
  • जागतिक आरोग्य यंत्रणा बळकट करावी
  • साथीविरोधातील यंत्रणा सक्षम करावी
  • विषाणूचे वहन प्राण्यांद्वारे होण्याची शक्यता असल्याने प्राण्यांच्या आरोग्यासाठी अधिक काम करावे
  • वारंवार संशोधन आणि साथ सुरू झालेल्या जागांवर वैद्यकीय पथकांच्या भेटी यामुळे साथ जागेवरच आटोक्यात आणणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Find out how the corona virus originated and spread