रशियाच्या कोरोना लशीची पहिली बॅच तयार; चीननेही दिली 'गुड न्यूज'

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 17 August 2020

कोरोना विषाणूवरील लस (Covid-19 vaccine) रशियाने तयार केल्यानंतर आता चीनही त्या दिशेने पुढे जात असल्याचं दिसत आहे.

बिजिंग- कोरोना विषाणूवरील लस (Covid-19 vaccine) रशियाने तयार केल्यानंतर आता चीनही त्या दिशेने पुढे जात असल्याचं दिसत आहे. जागतिक स्तरावर या दोन्ही देशांच्या लशींना अजून मंजुरी मिळाली नाही, पण उभय देशांनी लस निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे. रशियाने Sputnik V लशीची पहिली बॅच तयार केली आहे. दुसरीकडे चीनच्या  CanSino Biologics Inc कंपनीच्या Ad5-nCOV लशीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रशियानंतर आता चीननेही लस निर्मितीला सुरुवात केली आहे.

शाळा, कॉलेज सुरू करा; सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांचे म्हणणे 

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रभावी लस निर्माण होण्यासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जगभरातून रशिया आणि चीनच्या लशींबाबत शंका घेतली जात आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूवरील लसीच्या चाचणीसाठी जवळजवळ 1 लाख लोकांनी रस दाखवला आहे. लवकर लस निर्माण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पार्श्वभूमिच्या लोकांवर चाचणी घेणे आवश्यक असल्याचं लस टास्क फोर्सचे प्रमुख केट बिंघम म्हणाले आहेत. संशोधकांनी 65 वर्षांवरील आशियाई, कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्याक पार्श्वभूमिच्या लोकांना चाचणीसाठी येण्याचे आवाहन केले आहे. 

CanSino Biologics Inc कंपनीच्या  Ad5-nCOV लशीला 11 ऑगस्ट रोजी पेटेंट मिळालं आहे. Ad5-nCOV चीनची पहिली लस आहे जिला पेटेंट मिळालं आहे. CanSino ची लस सर्दी-खोकल्याचे एक सुधारित प्रारुप आहे, ज्यात कोरोना विषाणूचा एक जेनेटिक मटेरियल टाकण्यात आला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ-अस्त्राजेनेका यांनीही लस निर्मितीसाठी याच पद्धतीचा वापर केला आहे. 

...म्हणून कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत सोन्याचा भाव वाढतोय

रशियाच्या कोविड-19 Sputnik V लशीची पहिली बॅच तयार झाला आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयानुसार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटापर्यंत लस वापरासाठी उपलब्ध होईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यापूर्वी  Sputnik V लस प्रभावी असल्याचा दावा केला आहे. शिवाय ही लस त्यांच्या मुलीला देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या लशीच्या निर्मितीसाठी भारतातील अनेक कंपन्यांसोबत बोलणी सुरु आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडकडून याबाबतची बोलणी सुरु आहे. रशियाने पाच देशांशी दरवर्षी 50 कोटी डोस तयार करण्याची योजना बनवली आहे. भारताशिवाय रशियाने कोरिया आणि ब्राझील सोबत चर्चा सुरु केली आहे. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the first batch of Russian corona vaccines China vaccine news