देशाची लोकसंख्या 2 कोटी 38 लाख; कोरोना रुग्ण फक्त 481

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 16 August 2020

चीनपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तैवान देशाने सर्व देशांसमोर आदर्श ठेवला आहे.

ताईपे- जगभरात कोरोना महामारीचे थैमान सुरु आहे. अमेरिकेसारखी महासत्ता कोरोना विषाणू समोर हतबल होताना दिसत आहे. अशात चीनपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तैवान देशाने सर्व जगासमोर आदर्श ठेवला आहे. चीन आणि तैवानमधील अंतर 160 किलोमीटर आहे. शिवाय तैवानचा चीनसोबत मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. असे असताना तैवानमध्ये आतापर्यंत केवळ 480 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर केवळ 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 

तैवानने यश कसं मिळवलं?

डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान शहरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. जानेवारी महिन्यात काही देशांना याचं गांभीर्य लक्षात आलं. तैवानने डिसेंबरमध्येच या विषाणूला गांभीर्याने घेतले होते. चीनमधील वेबो आणि वि-चाट सारख्या अॅपमधून तैवानला धोक्याची घंटा मिळाली. आरोग्य अधिकारी फिलिप यांनी तैवानला सर्वात आधी धोक्याचा इशारा दिला. 

1947मध्ये भारतात पेट्रोल किती रुपयांना मिळत होतं? वाचा 74 वर्षांत बदललेला भारत

तैवानने सुरुवातीच्या काळातच जागतिक आरोग्य संघटनेला चीनमधील विषाणूबाबत माहिती दिली होती. तैवानने 31 डिसेंबर 2019 मध्येच चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी सुरु केली. असे करणारा तैवान पहिला देश ठरला. त्यानंतर काही काळातच वुहानमधून येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी आणण्यात आली. तैवानच्या अधिकाऱ्यांनी विषाणूबद्दल जाणून घेण्यासाठी वुहानला सगळ्यात आधी भेट दिली होती. 

तैवानने 20 जानेवारीला विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एका कमांड सेंटरची स्थापना केली. फेब्रुवारीमध्ये तैवानने चीनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांवर बंदी आणली. तैवान 2003 मधील SARS संसर्गापासून खूप काही शिकला आहे. SARS संसर्गात तैवानचा जगात तिसरा क्रमांक होता. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच देशाने चांगली खबरदारी घेतली. परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांची घरी जाऊन चाचणी घेण्यात आली. त्यामुळे सर्व बाधित रुग्णांना लवकरच शोधण्यात त्यांना यश मिळालं. तैवानची लोकसंख्या 2.38 कोटी आहे.

कमला हॅरिस यांच्यापेक्षा भारतीयांचं माझ्यावर जास्त प्रेम- डोनाल्ड ट्रम्प

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तैवानने आपले हॉस्पिटल आणि डॉक्टरांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी तयार केलं होतं. अनेक देशांना कोरोना महामारीचा धोका लक्षात येण्याआधीच तैवानने विषाणूविरोधात लढण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. सर्वाधिक प्रभावित भागातील नागरिकांना ट्रॅक करण्यात आले. त्यांना दिवसातून दोनवेळा फोन करुन ते घरी असल्याची खात्री करण्यात आली. शिवाय त्यांचे लोकेशनही ट्रॅक करण्यात आले.  देशात मोठ्या प्रमाणात पीपीई कीट आणि मास्कची निर्मिती करण्यात आली. शिवाय देशाने आतापर्यंत 1 करोड 70 लाख मास्क निर्यातही केले आहे. विषाणूबाबतचा धोका तैवानने लवकरच ओळखला आणि प्रसाराला रोखण्यासाठी सर्व आवश्यक पाऊल उचलली. त्यामुळे तैवान जगासमोर आदर्श ठरला आहे. विशेष म्हणजे कोरोनाविरोधात तैवानने घेतलेल्या उपायांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी तैवानचा दौरा केला आहे.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first country to overcome the Corona epidemic