रशियाच्या कोरोना लसीविषयी संशय; WHOची धक्कादायक माहिती 

टीम ई-सकाळ
Monday, 10 August 2020

संपूर्ण जगाचं लक्ष कोरोनाच्या लसीकडं लागलंय. जगात सध्या 150हून अधिक कोरोना लसींवर काम सुरू आहे. रशियाने आपल्याकडे कोरोनाची पहिली लस तयार झाली असल्याचा दावा केला आहे.

नवी दिल्ली : रशियाने येत्या दोन दिवसांत कोरोनावरील लस (First Covid-19 vaccine)जगापुढे आणण्याचा दावा केला आहे. रशियाच्या (Russia Covid19 Vaccine) आरोग्य मंत्रालयाने त्या दाव्याला दुजोरा दिला असून, या लसीची रितसर नोंदणीही करण्यात येणार आहे. पण, रशियाच्या या लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लसीच्या चाचणी संदर्भातील डेटा अधिकृतरित्या मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलीय. त्यामुळं रशियाच्या कोरोना लसीवर संशय निर्माण झालाय. 

आणखी वाचा - लंकेची सत्ता दोन भावांच्या हातात; एक राष्ट्रपती, दुसरा पंतप्रधान

डेटा शेअर केला नाही!
संपूर्ण जगाचं लक्ष कोरोनाच्या लसीकडं लागलंय. जगात सध्या 150हून अधिक कोरोना लसींवर काम सुरू आहे. त्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस लवकरात लवकर उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परंतु, रशियाने आपल्याकडे कोरोनाची पहिली लस तयार झाली असल्याचा दावा केला आहे. ही लस येत्या 12 ऑगस्टला येणार असल्याचेही रशियाने स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर, रशियातील नेते आणि श्रीमंत व्यक्तींना ही लस देण्यात आल्याचीही चर्चा सुरू आहे. या सगळ्यात जागतिक आरोग्य संघटनेने या लसीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रशियाने या लसीच्या चाचणीचा डेटा शेअर केला नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. 

आणखी वाचा - ब्राझीलची वाटचाल अमेरिकेच्या दिशेने; मृतांची संख्या वाढतेय

लस दिल्यानंतर, येतो ताप!
रशियात मॉस्कोमधील गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने कोविडवरची लस तयार केलीय. 
या संस्थेतील प्रमुख अलेक्झंडर गिंट्सबर्ग यांनी स्वतःलाही लस टोचून घेतली आहे. अलेक्झंडर यांनी दिलेल्या माहितीनुसार काहींना ही लस दिल्यानंतर ताप येऊ शकतो. त्यासाठी पॅरासिटामॉल गोळी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. लस दिल्यानंतर शरिरातील इम्युन सिस्टिमला जबरदस्त बुस्टर मिळतो. त्यामुळं काही जणांना ताप येऊ शकतो. पण, या साईड इफेक्टला पॅरासिटामॉलनं कमी करता येईल, असा दावा करण्यात आलाय. 

आरोग्य संघटना काय करतेय?
कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर ती जगात सर्वाांना तातडीने वितरीत व्हावी, सर्वांत पर्यंत ती लस पोहोचावी, यासाठी जागतिक आरोग्य संघटना प्रयत्न करत आहेत. संघटनेने WHO COVAX फॅसिलिटी सुरू केली आहे. लसीवर संशोधन करणाऱ्या देशांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे. या मोहिमेत 15 जुलैपर्यंत 75 देशांनी इंटरेस्ट दाखवला आहे. या मोहिमेसाठी जागतिक पातळीवर फंडही गोळा करण्यात येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first covid 19 vaccine russia doubtful who reaction