लंकेत वडील-मुलगा आणि 3 भावांच्या हाती सत्ता; एक राष्ट्रपती, दुसरा पंतप्रधान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांना शपथ देणारे देशाचे राष्ट्रपती हे त्यांचेच बंधू गोटबया राजपक्षे आहेत.

कोलंबो - श्रीलंकेत पुन्हा एकदा राजपक्षे यांचीच सत्ता आली असून महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांना शपथ देणारे देशाचे राष्ट्रपती हे त्यांचेच बंधू गोटबया राजपक्षे आहेत. श्रीलंका पीपल्स पार्टीने नुकत्याच झालेल्या निवडणूकीत दणदणीत विजय मिळवला. पक्षाने या निवडणुकीत दोन तृतियांश बहुमत मिळवले असून घटनेत सुधारणा करून घराण्याची सत्ताही कायम ठेवता येणार आहे. 

महिंदा राजपक्षे यांनी चौथ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. याआधी त्यांनी एप्रिल 2004 ते नोव्हेंबर 2005 याकाळात पहिल्यांदा पंतप्रधानपद भूषवले होते. त्यानंतर 2018 मध्ये 52 दिवसांसाठी पंतप्रधान होते. पुढे 2019 च्या नोव्हेंबर पासून 5 ऑगस्ट 2020 पर्यंत त्यांच्याकडेच पंतप्रधान पदाची धुरा होती.  2005 ते 2015 या काळात राष्ट्रपती म्हणूनही त्यांनी कार्यभाऱ सांभाळला. याच काळात संविधानातही सुधारणा करून तिसऱ्यांदा राष्ट्रपती होण्याची तरतूद केली. याशिवाय संविधानात अशा पद्धतीच्या सुधारणा केल्या की ज्यामुळे राजपक्षे घराण्याचीच सत्ता राहू शकेल. 

हे वाचा - श्रीलंकेत महिंदा राजपक्षे चौथ्यांदा पंतप्रधान; घराण्याची सत्ता कायम

राष्ट्रपती गोटबया राजपक्षे
सध्या लंकेचे राष्ट्रपती असलेले गोटबया राजपक्षे हे 1992 ला अमेरिकेला जाण्याआधी लंकेच्या सैन्यात कर्नल होते. लिट्टे विरुद्धच्या कारवाईतही ते मैदानात उतरले होते. देशात राजपक्षे कुटुंबात पुन्हा सत्ता आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. 2019 ला झालेल्या बाँबस्फोटानंतर सत्तेची चक्रे फिरली आणि राष्ट्रपती निवडणुकीमध्ये गोटबया विजयी झाले. महिंदा राजपक्षे यांचे लहान भाऊ असलेले गोटबया यांनीच एसलीपीपीची स्थापना केली होती. त्यांनी माजी आर्थिक विकास मंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं. 

चमाल राजपक्षे
महिंदा राजपक्षे राष्ट्रपती असताना त्यांचे मोठे बंधू चमाल हे संसदेचे सभापती होते. 2019 मध्ये गोटबया राजपक्षे राष्ट्रपती झाल्यानंतर नव्या सरकारमध्ये त्यांना कृषी आणि ग्रामिण विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. याशिवाय इतर मंत्रालयांच्या जबाबदाऱ्याही त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या. 

हे वाचा - भारतीय भूखंड वेगानं सरकतोय; अफ्रिका, अटलांटिकापासून जातोय दूर

नमल राजपक्षे
लंकेत आता राजपक्षे घराण्यातच सत्ता असून महिंदा राजपक्षे यांचा मुलगा नमल हासुद्धा निवडणुकीत विजयी झाला आहे. याआधीही नमल राजकारणात होता मात्र त्याच्याकडे कोणत्याही विभागाची जबाबदारी देण्यात आली नव्हती. राजपक्षे कुटुंबाचा उत्तराधिकारी म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जात आहे. 

Edited By - Suraj Yadav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: srilanka rajpaksa family have power of country