औपचारिकता पूर्ण; जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात थेट लढत

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 19 August 2020

डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन यांची आज (19 ऑगस्ट) अध्यक्षीय निवडणुकीतील पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले होते.

वॉशिंग्टन- डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन यांची आज (19 ऑगस्ट) अध्यक्षीय निवडणुकीतील पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले होते. प्रायमरीज्‌च्या निवडणूकीत इतरांपेक्षा आघाडीवर असलेल्या बायडेन यांच्या निवडीची केवळ औपचारिकता उरली होती. तीन नोव्हेंबरला अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत ते रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लढत देतील. बिडेन यांनी त्यांच्या ‘रनिंग मेट’, म्हणजे उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलेची मागितली माफी; मतांसाठी नवी चाल

जो बायडेन (वय ७७) यांनी बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात सलग आठ वर्षे देशाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या देशभरातील नेत्यांनी आज झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत बायडेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पक्षाने आता अध्यक्षपदासाठी संधी दिल्याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. बिडेन उमेदवारी स्वीकृतीचे भाषण उद्या (ता. २०) करणार आहेत. अमेरिकेत सध्या कोरोना विषाणू आणि त्यामुळे मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था असे दुहेरी संकट आहे. या संकटातून बाहेर काढण्याचा विश्‍वास मतदारांमध्ये निर्माण करण्याचे आव्हान बायडेन-हॅरिस यांच्यासमोर आहे. रिपब्लिकन पक्षाची पुढील आठवड्यात बैठक असून त्यात ट्रम्प यांचे उमेदवार म्हणून नाव जाहीर होईल. अमेरिकेतील निवडणूकपूर्व सर्वेक्षणात बिडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा ७.७ पॉइंटने आघाडीवर आहेत.

तीन माजी अध्यक्ष पाठिशी

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आधीच जो बायडेन यांच्या बाजूने प्रचारात उडी घेतली आहे. त्यानंतर आज माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही आज ट्रम्प यांच्या कारभारावर टीका केली. ‘ट्रम्प म्हणतात की अमेरिका जगाचे नेतृत्व करत आहे. मात्र, बेरोजगारीचा दर तिप्पट झाला आहे असा आपला एकमेव देश आहे. यावेळी सरकारने आघाडीवर राहून नेतृत्व करायला हवे, मात्र तिथे सर्वत्र गोंधळ आहे,’ असे क्लिंटन यांनी म्हटले आहे. अमेरिकेला सध्याच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी जो बायडेन हेच योग्य उमेदवार असल्याची पावती माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांनीही दिली आहे.

चीनची कोविड-19 लस डिसेंबरपर्यंत येणार बाजारात; भारताला मिळणार का?

दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाने जोरदार प्रचार सुरु केला आहे. यावेळीच्या निवडणुका खास असणार आहेत. कोरोना महामारीमुळे देशातील परिस्थिती पूर्ण बदलली आहे. आर्थिक पातळीवरही अमेरिकेची पिछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदावर कोण विराजमान होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Formality complete A direct fight between Joe Biden and Donald Trump