पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

माजी लष्करप्रमुख व माजी राष्ट्रपती असलेल्या मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर ही शिक्षा सुनाविण्यात आली आहे. पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या नेतृत्वाखालील विशेष न्यायालयाच्या पीठाने हा निकाल दिला.

इस्लामाबाद : देशद्रोहाच्या आरोपावरून पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना पाकिस्तानमधील विशेष न्यायालयाने आज (मंगळवार) मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माजी लष्करप्रमुख व माजी राष्ट्रपती असलेल्या मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर ही शिक्षा सुनाविण्यात आली आहे. पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या नेतृत्वाखालील विशेष न्यायालयाच्या पीठाने हा निकाल दिला. या पीठामध्ये सिंध उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नझर अकबर आणि लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाहीद करीम यांचा समावेश होता. सध्या 76 वर्षांचे असलेले मुशर्रफ दुबईत उपचार घेत आहेत. प्रकृतीचे कारण देत त्यांनी पाकिस्तानात परतण्यास नकार दिला होता. 

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होणार 18 जणांचा शपथविधी 

याआधी उच्च न्यायालयाने विशेष न्यायालायला निर्णय देण्यापासून थांबवण्याचे आदेश दिले होते. गेल्या महिन्यात हा निर्णय राखून ठेवला होता. मात्र, आज झालेल्या सुनावणीत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनाविण्यात आली. 2007 मध्ये पाकिस्तानात आणीबाणी लागू केल्याप्रकरणी तत्कालीन लष्करशहा असलेल्या मुशर्रफ यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला सुरू झाला होता. या खटल्यात मुशर्रफ यांना न्यायालयाने मार्च 2014 मध्येच दोषी ठरविले आहे. मुशर्रफ यांनी संबंधित खटल्यास सामोरे जाण्यासाठी लष्करी संरक्षण पुरविणे तसेच, दुबईला जाण्यासाठी मुभा देणे, अशा अटी सरकारसमोर ठेवल्या होत्या. त्यांच्यावर देशद्रोहासारखा गंभीर खटला सुरू असून, फरार मुशर्रफ यांना कोणत्याही अटी घालण्याचा अधिकार नाही. प्रत्यक्ष समर्पण करेपर्यंत त्यांना अशी कोणतीही मागणी करता येणार नसल्याचे पाकिस्तान सरकारने विशेष न्यायालयासमोर स्पष्ट केले होते. पाकिस्तानात आणीबाणी लागू करून सर्वोच्च न्यायालयासह अनेक वरिष्ठ न्यायाधीशांना अटक करण्यात आली होती. मुशर्रफ यांनी मार्च 2016 मध्ये पाकिस्तानातून दुबईला पलायन केले होते. मे 2016 मध्ये त्यांना न्यायालयाने फरार घोषित केले होते.

राहुल-सावरकर-रेप इन इंडिया, काय आहे यामागचे सत्य?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former military dictator Musharraf handed death sentence in high treason case