"पाकच्या काश्‍मीर धोरणाने समस्या सुटणार नाहीत'

पीटीआय
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

काश्‍मीर समस्येचे निराकरण झाले; तरी त्यामुळे पंथीय (शिया-सुन्नी) दहशतवाद कसा थांबेल? काश्‍मीरप्रश्‍नी मिळालेले उत्तर अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या तालिबानला कसे रोखू शकेल?

वॉशिंग्टन - जम्मु काश्‍मीरसंदर्भात पाकिस्तानकडून दशकानुदशके राबविण्यात येत असलेल्या मुलभूत धोरणाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत पाकिस्तानच्या एक ज्येष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने काश्‍मीर समस्येचे निराकरण झाल्यानंतरही या भागातील दहशतवाद, शिया सुन्नी संघर्ष आणि अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक सत्ता स्थापन करण्यासंदर्भातील तालिबानचा प्रयत्न, ही आव्हाने कायमच राहणार असल्याची स्पष्टोक्ती केली आहे. पाकिस्तानचे अमेरिकेमधील माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी ही भूमिका मांडली आहे.

"काश्‍मीर समस्येचे निराकरण झाले; तरी त्यामुळे पंथीय (शिया-सुन्नी) दहशतवाद कसा थांबेल? आपल्यापेक्षा वेगळ्या पंथाच्या असलेल्यांची हत्या करणे सुरुच राहिल. काश्‍मीरप्रश्‍नी मिळालेले उत्तर अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या तालिबानला कसे रोखू शकेल? यामुळे या प्रकरणी दोन्ही बाजुंकडून भूमिकांचा पुनर्विचार व्हावयास हवा,'' असे हक्कानी म्हणाले.

वॉशिंग्टन येथील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना हक्कानी यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. "अ न्यू युएस ऍप्रोच टू पाकिस्तान: एनफोर्सिंग एड कंडिशन्स विदाऊट कटिंग टाईज,' या अमेरिकेमधील "पाकिस्तान अभ्यासकांनी' लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी पाकिस्तानच्या दूतावासामधील काही अधिकारी, पत्रकारांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्नही केला. यांमधील एका नागरिकास कार्यक्रमामधून बाहेर काढण्यात आले. निघताना या नागरिकाने हक्कानी हे "रॉ एजंट' असल्याचा आरोप केला!

Web Title: Former Pakistan envoy to US questions Islamabad's Kashmir policy