इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोर्सी यांचे न्यायालयात निधन

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांना न्यायालयामध्ये न्यायाधिशांनी त्यांची बाजू मांडायला सांगितल्यानंतर ते बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला

कैरो : इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांचे सोमवारी (ता. 17) न्यायालयातच निधन झाले. न्यायालयामध्ये न्यायाधिशांनी त्यांना त्यांची बाजू मांडायला सांगितल्यानंतर ते बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले.

देशाच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गुप्तहेरीच्या आरोपाच्या सुनावणीसाठी 67 वर्षीय मोहम्मद मोर्सी न्यायालयात हजर होते. यावेळी त्यांना न्यायाधिशांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी सांगितले. मोर्सी त्यावेळी अचानक बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

दरम्यान, मोहम्मद मोर्सीवर फलस्तिनी इस्लामवादी संघटना हमाससोबत संपर्क असल्याचा आणि गुप्तहेरीचा आरोप होता. 2012 मध्ये आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या एका व्यक्तीच्या हत्येसाठी ते 20 वर्षांची शिक्षा भोगत होते. मोहम्मद मोर्सी हे 2012 मध्ये देशाचे राष्ट्रपती बनले होते. मोर्सी यांचा संबंध मुस्लीम ब्रदरहूड या देशातील सर्वात मोठ्या इस्लामी संघटनेशी होता. पण आता ही संघटना बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे. इजिप्तच्या सैन्याने मोठ्या आंदोलन आणि विरोधानंतर 2013 मध्ये मोर्सी यांची सत्ता उलथवली होती. सैन्याने मोर्सीसह संघटनेच्या अनेक नेत्यांना अटक केली होती. अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करणारे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी व्यवसायाने अभियंता होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former president of Egypt Mohamed Morsi dies in court