इंडोनेशियात भूकंपात चौदा ठार ; दीडशे जखमी 

पीटीआय
सोमवार, 30 जुलै 2018

इस्ट लोबोंक जिल्ह्याला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला असून, तेथे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका मलेशियन नागरिकाचा समावेश आहे. भूकंपामुळे रिनीजानी पर्वतीय क्षेत्रात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

जाकार्ता : इंडोनेशियातील शक्तिशाली भूकंपामुळे चौदा जण ठार, तर 160 हून अधिक जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे हजारांवरून अधिक घरांची पडझड झाली आहे. बाली बेटापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले लोकप्रिय पर्यटनस्थळ लोम्बोक येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. स्थानिक वेळेनुसार सकाळी सात वाजता भूकंप झाला असून, त्याची तीव्रता 6.4 रिश्‍टर स्केल इतकी होती. 

इंडोनेशियाच्या आपत्कालीन विभागाचे प्रवक्ते सुतोपो पुर्वो नुग्रोहो म्हणाले, की मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शंभराहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. शेकडो घरांची हानी झाली असून, जखमी आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. नुगरोहो यांनी भूकंपग्रस्त भागातील फोटो ट्‌विटरवरून शेअर केले आहेत. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी भूकंपाचा जोरात हादरा बसला. या प्रचंड हादऱ्याने नागरिक घाबरले आणि सैरावरा पळू लागले. भूकंपानंतर काही मिनिटांतच शहरातील वीज गेली आणि एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, इस्ट लोबोंक जिल्ह्याला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला असून, तेथे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका मलेशियन नागरिकाचा समावेश आहे. भूकंपामुळे रिनीजानी पर्वतीय क्षेत्रात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. लोम्बोक बेटावर तिघांचा मृत्यू झाल्याचे आपत्कालीन विभागाने म्हटले आहे. माउंट रिनीजानी नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वाराचीदेखील नासधूस झाल्याचे पोलिसांनी सांगितले.  

Web Title: Fourteen killed in earthquake in Indonesia Hundreds injured