Keir Starmer : ‘मजूरां’नी घडविले चौदा वर्षांनी सत्तांतर;ब्रिटनमध्ये सुनक यांचा पराभव,कीर स्टार्मर होणार नवे पंतप्रधान

ब्रिटिश राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाचे आश्वासन देत सर्वांगीण बदलाचा पुरस्कार करणाऱ्या मजूर पक्षाने (लेबर पार्टी) संसदीय निवडणुकीत सर्वोच्च नेते कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली आज ब्रिटनची सत्ता काबीज केली.
Keir Starmer
Keir Starmer sakal

लंडन : ब्रिटिश राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाचे आश्वासन देत सर्वांगीण बदलाचा पुरस्कार करणाऱ्या मजूर पक्षाने (लेबर पार्टी) संसदीय निवडणुकीत सर्वोच्च नेते कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली आज ब्रिटनची सत्ता काबीज केली. येथे तब्बल चौदा वर्षांनी हा पक्ष सत्तेत आला असून मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला (कंझर्व्हेटिव्ह पार्टी) पराभवाचे तोंड पाहावे लागले. सुनक यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नेतेपदाचा राजीनामा देऊ केला आहे.

या विजयानंतर स्टार्मर (वय ६१) यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन राजे चार्ल्स (तृतीय) यांची भेट घेतली. ते आता ‘१० डाउनिंग स्ट्रीट’ची सूत्रे हाती घेतील. संसदीय निवडणुकीत मजूर पक्षाने ६५० जागांपैकी ४०० पेक्षा अधिक जागांवर विजय प्राप्त केला असून हा पक्ष बहुमताजवळ पोचला आहे. हुजूर पक्षाला मात्र १२१ जागांवर समाधान मानावे लागले आहे. लंडनमध्ये केलेल्या विजयी भाषणात स्टार्मर यांनी बदलाला सुरूवात झाली असून आता मला खरोखरच आनंद होतो आहे असे नमूद केले.

‘‘ हे एवढे मोठे बहुमत एक मोठी जबाबदारी घेऊन येत असते. देशाला एकसंध ठेवणाऱ्या संकल्पनांचे पुनरुज्जीवन करायला हवे. हे राष्ट्रीय पुनरुज्जीवन आहे. तुम्ही कुणीही असा, कोठेही असा, नियमाने काम केल्यास हा देश प्रत्येकाला योग्य संधी देईल,’’ असे स्टार्मर यांनी सांगितले. ऋषी सुनक हे उत्तर इंग्लंडमधील रिचमंड आणि नॉर्थॲलर्टन येथून २३ हजार ०५९ मतांनी विजयी झाले पण त्यांच्या पक्षाला मात्र पराभूत व्हावे लागले.

भारताला काय?

जम्मू- काश्मीरच्या मुद्यावरून मजूर पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे या पक्षाचे भारतासोबतचे संबंध बिघडले होते. आता ते पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान स्टार्मर यांच्यासमोर असेल. मुक्त व्यापार कराराबाबत दोन्ही देशांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे पण त्यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. स्टार्मर यावर निर्णायक पावले टाकतील अशी अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com