फ्रान्सचा मालीमधील दहशतवाद्यांवर एअर स्ट्राईक; 50 जणांचा खात्मा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

मागील काही दिवसांपासून फ्रान्स सातत्याने दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे चर्चेत आहे.

पॅरिस : फ्रान्सच्या हवाई दलाने अफ्रिकेमधील माली या देशात असलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांवर जोरदार हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यामध्ये जवळपास 50 दहशतवादी ठार झाले असल्याची माहीती फ्रान्सने दिली आहे. फ्रान्सच्या हवाई दलाच्या मिराज विमाने आणि लढाऊ ड्रोन विमानांनी ही कामगिरी पार पाडली आहे. हा एअर स्ट्राईक गेल्या शुक्रवारी बुर्कीन फासो आणि नायरजवळील सीमावर्ती भागात करण्यात आला आहे. 

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने काश्मीरला दाखवलं पाकचा भाग

याबाबतची माहीती फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यानी दिली. संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी म्हटलं की, फ्रान्सच्या हवाई दलाने 30 ऑक्टोबर रोजी ही कारवाई पार पाडली आहे. या कारवाईमध्ये 50 हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. याशिवाय दहशतवाद्यांच्या शस्त्रसाठ्याचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यामध्ये चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात फ्रान्सच्या सैन्याला यश आलं आहे. तसेच, आत्मघाती  हल्ल्यासाठी वापरण्यात येणारे कोट आणि स्फोटकेही त्यांच्याकडून मिळाली आहेत. 
हे दहशतवादी अल कायदाशी संबंधित होते. फ्रान्स सरकारने दिलेल्या माहीतीनुसार, हे दहशतवादी ग्रुप ऑफ इस्लाम एँड मुस्लिम संघटनेसाठी काम करत होते. हे सगळे दहशतवादी एकत्रितपणे मोटारसायकलवरुन प्रवास करत जात होते. त्यावेळी  फ्रान्सच्या ड्रोनने त्यांना पाहिले आणि मग त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 

हेहीे वाचा - US election: 'गाढव' की 'हत्ती' कोण मारणार बाजी? जाणून घ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

मागील काही दिवसांपासून फ्रान्स सातत्याने दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे चर्चेत आहे. इस्लामिक कट्टरवाद्यांनी फ्रान्सवर सातत्याने दहशतवादी हल्ले केले आहेत. गेल्या काही आठवड्यांपूर्वीच पॅरिसमध्ये एका  शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धडा शिकवताना या शिक्षकाने चार्ली हेब्दोमध्ये प्रकाशित झालेल्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवले होते. यामुळे एका कट्टर मुस्लिम युवकाने हा हल्ला केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी चर्चमध्ये एकाने तिघांची हत्या केली  होती. मात्र, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्यूअल मॅक्रोन यांनी याविरोधात ठाम भुमिका घेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत दहशतवादाचा बिमोड करण्याचा एल्गार केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: france airstrike in mali killed 50 terrorist of Al Qaeda