Corona Outbreak: युरोपात कोरोनाची दुसरी लाट; फ्रान्समध्ये ओलांडला १० लाखाचा टप्पा!

वृत्तसंस्था
Friday, 23 October 2020

१९ ऑक्टोबर या एकाच दिवशी ७६ हजार २५८ इतक्या विक्रमी संख्येत कोरोनाची नवी प्रकरणे आढळून आली होती. सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव असलेला फ्रान्स हा पश्चिम युरोपमधील दुसरा देश ठरला आहे.

पॅरिस : कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात थैमान घातले आहे. युरोपात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून फ्रान्समध्ये अवघ्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये कोरोनाची १० लाख प्रकरणे समोर आली आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. त्यानंतर केवळ काही दिवसांतच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची प्रकरणे दिसून आल्याने फ्रान्सची चिंता वाढली आहे. 

पाकिस्तानच्या चौघांना भारतीयत्व बहाल; पिंपरी-चिंचवडमध्ये आहे वास्तव्य!​

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरच्या म्हणण्यानुसार, फ्रान्समध्ये सध्या १० लाख ३६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सहा दिवसांमध्ये २० हजार नवी प्रकरणे आढळून आल्याने पंतप्रधान मॅक्रॉन यांनी राष्ट्रीय आरोग्य आणीबाणीची घोषणा करत लॉकडाउन जाहीर केले होते. 

बुधवारी (ता.२१) फ्रान्समध्ये २७ हजार नवीन प्रकरणे नोंदविली गेली आहेत. तर १९ ऑक्टोबर या एकाच दिवशी ७६ हजार २५८ इतक्या विक्रमी संख्येत कोरोनाची नवी प्रकरणे आढळून आली होती. सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव असलेला फ्रान्स हा पश्चिम युरोपमधील दुसरा देश ठरला आहे. या यादीत स्पेन आघाडीवर आहे. स्पेनमध्ये बुधवारीच दहा लाखाहून अधिक नागरिक कोरोना बाधित झाले असल्याचे आढळून आले होते. 

लेहचे लोकेशन चीनमध्ये दाखवलं; भारताने ट्विटरला दिला इशारा​

बऱ्याच युरोपियन देशांमध्ये अलिकडच्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये धक्कादायक वाढ दिसून आली आहे. त्यामुळे या खंडात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. मॅक्रॉन आणि फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स या दोघांनीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल जाहीरपणे आपले मत मांडले आहे. 

दरम्यान, युनायटेड किंगडमनेही कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढत चालल्याचे पाहून काही भागांमध्ये लॉकडाऊन लागू केले आहे. तर आयर्लंडने सहा आठवड्यांच्या लॉकडाउनची पुन्हा नव्याने घोषणा केली आहे. जुलै महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होऊ लागल्याने फ्रान्स सरकारने सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: France Covid-19 cases surpasses 1 million