पाकिस्तानच्या चौघांना भारतीयत्व बहाल; पिंपरी-चिंचवडमध्ये आहे वास्तव्य!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

पूर्व पाकिस्तानातून स्थलांतरीत झालेले काही निर्वासित पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात स्थायिक झाले आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या प्रक्रियेसाठी पुढाकार घेतला होता.

पुणे : "पाकिस्तानात खूप असुरक्षित वातावरण आहे. तेथे मुले शाळेत गेली तरी घरी कधी परत येतील, अशी चिंता असायची. नातेवाईकांपासून दुरावल्याचेही दु:ख होते. त्यामुळे पाकिस्तानमधून घरदार सर्व काही सोडून कुटुंबासह पिंपरी-चिंचवडमध्ये नातेवाईकांकडे येण्याचा निर्णय घेतला. आम्ही 11 वर्षांपासून येथे राहतो. स्थानिक नागरिकांचेही खूप प्रेम मिळाले. आम्हाला येथे कोणतेही टेन्शन नाही. सुरक्षितता आणि मुलांच्या उज्जल भविष्यासाठी आम्ही भारतात आलो. भारतीय नागरिकत्व मिळाल्याचा आम्हाला खूप आनंद होतोय.'' रमेशलाल घनशामदास रामनानी 'सकाळ'शी बोलत होते. 

ओवैसींचं योगी आदित्यनाथांना चॅलेंज; 'तुम्ही योगी आहात हे २४ तासात सिद्ध करून दाखवा!'​

पाकिस्तानच्या चार निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले. तर, अन्य भारतीय नागरिकत्वासाठी इच्छुक असलेल्या पाकिस्तानच्या 16 आणि बांगलादेश येथील एक अशा 17 निर्वासित नागरिकांना भारतीय संविधानाचे पालन करण्याबाबत शपथ देण्यात आली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता.२२) आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानच्या चार निर्वासितांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी अतिरिक्‍त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, नायब तहसीलदार नागेश गायकवाड आदी उपस्थित होते. 

थकबाकीदारांनी महावितरणचं ऐकलं; भरली १०० कोटींची थकबाकी!​

पूर्व पाकिस्तानातून स्थलांतरीत झालेले काही निर्वासित पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात स्थायिक झाले आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या प्रक्रियेसाठी पुढाकार घेतला होता. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत पाकिस्तानी परंतु पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात स्थायिक असलेल्या एकूण 87 नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. यासोबतच यूएस, फिलिपिन्स आणि केनिया येथील सात नागरिकांना भारतीय संविधानाचे पालन करण्याबाबत शपथ देण्यात आली. त्यांना केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Pakistani refugees were granted Indian citizenship by Pune Collector office