
फ्रान्सच्या मायोट भागाला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. चिडो या चक्रीवादळामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चक्रीवादळानंतर सगळीकडे उद्ध्वस्त झाल्यासारखी स्थिती आहे. स्थानिक लोकांना अनेक दिवसांपासून प्यायला पाणी नाहीय. तसंच खाण्यासाठीही काहीच नाही. अनेकांची घरे वादळात कोसळली. तर काहींच्या घरांचे पत्रे उडून गेले आहेत. अधिकाऱ्यांनी अशी भीती व्यक्त केलीय की या चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या हजारोंच्या पटीत असू शकते.
चिडो चक्रीवादळ इतकं भयंकर होतं की मायोट भागात २२५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. पत्राच्या छत असलेल्या झोपड्यांमध्ये आणि घरांमध्ये राहणाऱ्यांचा आसराच नाहीसा झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून प्यायला पाणी उपलब्ध नाही. तर काहींना उपाशीपोटी झोपावं लागलं असल्याचं स्थानिकांनी सांगितलं.