ब्रिटनसह जगातील काही देशात सायबर हल्ला; हल्लेखोरांची पैशांची मागणी

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

ब्रिटनसह जगभरातील जवळपास शंभर देशात मोठा सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे ब्रिटनमध्ये आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी हल्लेखोरांनी पैशांची मागणी केल्याचेही वृत्त आहे.

लंडन/माद्रिद - ब्रिटनसह जगभरातील जवळपास शंभर देशात मोठा सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे ब्रिटनमधील आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी हल्लेखोरांनी पैशांची मागणी केल्याचेही वृत्त आहे.

"रॅंसमवेअरच्या' माध्यमातून हा हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आलेले हॅकिंग टूल हे अमेरिकेतील "युएस नॅशनल सिक्‍युरिटी एजन्सी'ने तयार केल्याची शक्‍यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. या हल्ल्यामुळे ब्रिटनमधील आरोग्य यंत्रणेसह आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवा देणाऱ्या "फेडएक्‍स' या कंपनीवरही मोठा परिणाम झाला आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार हॅकर्सनी संगणक सेवा पूर्ववत करण्यासाठी 300 ते 600 डॉलर्सची मागणी केल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यामुळे आतापर्यंत रशिया, युक्रेन आणि तैवानसह जगातील 57 हजार ठिकाणी परिणाम झाला असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

रॅंसमवेअर म्हणजे काय?
सायबर हल्ल्याद्वारे एखाद्या संगणकावरील संपूर्ण माहिती ब्लॉक करून ती पूर्ववत करण्यासाठी पैशाची मागणी करण्याचा प्रकार म्हणजे "रॅंसमवेअर'. या प्रकारामुळे व्हायरसद्वारे संगणकीय यंत्रणा हॅक करून हॅक झालेल्या संगणकावर केवळ पैशाची मागणी करणारा संदेश दिसतो.

Web Title: Global 'Ransomware' Attack Disrupts British Hospitals, International Shipper FedEx